बुलडाणा जिल्ह्यातील शहीद जवान गायकवाड व खार्डेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
42

बुलडाणा,दि.02(विशेष प्रतिनिधी):महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभुरखेडाजवळ भूसुरूंग स्फोटात शहीद झालेल्या सर्जेराव उर्फ संदीप एकनाथ खार्डे (३०, रा. आळंद, ता. देऊळगाव राजा) आणि मेहकर येथील राजू नारायण गायकवाड (३२) यांच्या पार्थिवावर ३ मे रोजी दुपारी १२.३० ते १ च्या दरम्यान शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जवानांच्या अंत्यदर्शनासाठी हजारोच्या संख्येने परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी नक्षलवादाच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. नक्षलवाद नष्ट कर, अशा घोषणा देऊन प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागृत झाल्याचे चित्र दिसून आले.राजू गायकवाड यांची मुलगी गायत्री हिनेही आपल्या शहीद बाबाचे अंतिमदर्शन हात जोडून घेतले.
गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेड नजीक नक्षलींनी भूसुरूंग स्फोट घडविला होता. त्यात १५ जवान शहीद झाले होते. त्यात बुलडाणा जिल्ह्याच्या दोन जवानांचाही समावेश होता. या घटनेत शहीद झालेल्या जवानांना गडचिरोली येथे २ मे राजी श्रद्धांजली वाहण्यात आल्यानंतर त्यांचे पर्थिव आज ३ मे रोजी बुलडाणा जिल्ह्यात पोहचले. दरम्यान, शहीद जवान राजू नारायण गायकवाड यांचे पार्थिव मेहकर येथे आल्यानंतर दुपारी १२.३० वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तर सर्जेराव उर्फ संदीप यांचे पार्थिव हे देऊळगाव राजा तालुक्यातील आळंद येथे आनल्यानंतर शहीद जवानांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप खार्डे यांचे चुलत भाऊ समाधान खार्डे यांनी मुखाग्नी दिला. शहीद जवान राजू गायकवाड यांच्या पार्थिवावर जानेफळ रोडवरील मोक्षधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तर आळंद येथे शहीद जवान संदीप खार्डे यांच्या पार्थिवावर त्यांच्या शेतातच अंत्यसंस्कार करण्यात आले.

सर्जेराव खार्डे मूळचे आळंद ता. दे.राजा येथील असून त्यांना नयना नावाची तीन वर्षांची मुलगी आहे. ते पत्नी स्वाती समवेत कुरखेडा येथे राहत होते. सर्जेराव खार्डे 2 मार्च 2011 रोजी गडचिरोली पोलीस दलात रूजू झाले होते. त्यांच्या पश्चात आई –वडील, एक भाऊ आहे. गावाशेजारी असलेल्या त्यांच्या शेतामध्येच शहीद सर्जेराव खार्डे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी गावातून सजविलेल्या रथातून शहद सर्जेराव यांच्या पार्थिवर शेतामध्ये आणण्यात आले. पोलीस जवानांनी बंदूकीच्या तीन फैरी झाडून शहीद सर्जेराव खार्डे यांना मानवंदना दिली. यावेळी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, माजी आमदार तोताराम कायंदे, रविकांत तुपकर, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे, उपविभागीय अधिकारी विवेक काळे, प्र. तहसिलदार संतोष कणसे, कल्याणी शिंगणे, नितीन शिंगणे, गंगाधर जाधव आदींसह लोकप्रतिनिधी, प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, बुलडाणा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राजू नारायण गायकवाड हे मूळचे प्रभाग क्रं 7, अण्णाभाऊ साठे नगर मेहकर येथील आहेत. त्यांना 3 वर्षांची मुलगी गायत्री व 9 महिन्यांचा मुलगा समर्थ आहे. गेल्या काही वर्षांपासून ते पत्नी भारतीसमवेत गडचिरोली येथे राहत होते. राजू गायकवाड 1 फेब्रुवारी 2011 रोजी गडचिरोली पोलीस दलात रूजू झाले होते. त्यांच्या पश्चात आई – वडील, काका व आप्तेष्ट आहेत. राजू गायकवाड यांचे पार्थिव सजविलेल्या रथात त्यांच्या निवासस्थानापासून मेहकर शहरातून जानेफळ रस्त्यावरील स्मशानभूमीत आणण्यात आले. या ठिकाणी पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद राजू गायकवाड यांना मानवंदना दिली. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ संजय रायमूलकर, माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप पाटील- भुजबळ, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसिलदार संजय गरकल, नगराध्यक्ष कासम गवळी, उपनगराध्यक्ष जयचंद बाठीया, लोणारचे नगराध्यक्ष साहेबराव पाटोडे, मुख्याधिकारी श्री. वायकोस, श्याम उमाळकर, लक्ष्मण घुमरे, खामगांवचे अप्पर पोलीस अधिक्षक हेमराज राजपूत आदींसह लोकप्रतिनिधी, प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, बुलडाणा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.