खेळत रहा, नेहमी आनंदी रहाल- जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

0
22

वाशिम, दि. ०४ : खेळामुळे माणूस निरोगी व उत्साही, आनंदी राहतो. त्यामुळे रोज खेळासाठी रोज थोडातरी वेळ देत रहा, आनंदी राहाल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले. जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र यांच्याद्वारे आयोजित ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये, तालुका क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, जिल्हा क्रीडा संघटक धनंजय वानखेडे, बाळासाहेब गोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिरामुळे मोफत क्रीडा प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या शिबिराचा लाभ ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, खेळाडूंनी घेवून विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण घ्यावे. आज क्रीडा क्षेत्रात सुध्दा करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यादृष्टीने यश संपादन करण्यासाठी खेळाडूंनी प्रयत्न करावेत. प्रत्येकाने दिवसातील काही वेळ खेळासाठी द्यावा. आपण खेळत राहिलो तर आनंदी राहू, असे त्यांनी सांगितले.

पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले, खेळाच्या माध्यमातूनही करिअर घडविण्याच्या अनेक संधी आहेत. आज अनेक खेळाडूंनी आपल्या क्रीडा क्षेत्रातील यशाच्या जोरावर मोठमोठ्या पदांवर नोकरी मिळविली आहे. तसेच विविध क्षेत्रात मोठ-मोठ्या पदांवर झेप घेतली आहे. त्यामुळे पालकांनी व मुलांनीही खेळाकडे करिअर म्हणून पाहण्याची गरज आहे. इतर क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रातही प्रामाणिक प्रयत्न व कठोर मेहनत केल्यास यश हमखास मिळते, याची अनेक उदाहरणे आपण पहिले आहेत. त्यामुळे खेळाडूंनी मेहनतीवर विश्वास ठेवून यशस्वी होण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.प्रारंभी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. शेटीये यांनी प्रास्ताविक केले. संचालन संजय शिंदे यांनी केले, तर आभार श्री. उप्पलवार यांनी मानले. यावेळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेले खेळाडू, प्रशिक्षक उपस्थित होते.