मोक्षधाम सौंदर्यीकरण, विकासकामांचे नगराध्यक्षांनी दिले प्रशासनाला निर्देश

0
17
गोंदिया,दि.05 : गोंदिया शहरातील मोक्षधाम परिसराला अधीक सुविधासंपन्न आणि त्याचे सौंदर्यीकरण करण्याकरिता पालिका प्रशासनाने लक्ष घातले आहे. नागरिकांच्या मागणीवरून पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी शनिवारी(दि.०४) पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांसह खुद्द पाहणी करून आवश्यक ती कामे तसेच सौंदर्यीकरण करण्याचा कृती आराखडा तयार करून तत्काळ ती कामे अमलात आणण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. नगराध्यक्षांच्या या निर्णयामुळे मोक्षधाम परिसराला विकासकामे आणि सौंदर्यीकरण यांची झळाळी मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांत नगर पालिका प्रशासनाने मोक्षधाम परिसरात अनेक कामे करण्यात आली. त्याकरिता स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचे सहकार्य देखील लाभत आहे. त्यामुळे तीन वर्षांमध्ये मोक्षधाम परिसराचा कायापालट झाला. शहरातील काही नागरिकांनी पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांची भेट घेवून या परिसरात पुन्हा कामे हाती घेण्याची मागणी केली होती. त्या मागणीला साद देत अशोक इंगळे यांनी शनिवारी पालिकेचे सभापती बेबी अग्रवाल, सदस्य राजू कुथे, बजरंग दलाचे देवेश मिश्रा, भाजपचे सचिव अमृत इंगळे, रॉकी नायक, अजिंक्य इंगळे, राजा कदम, सुनिल तिवारी यांच्यासह प्रत्यक्ष जावून मोक्षधाम परिसराची पाहणी केली. यावेळी अध्यक्ष इंगळे यांनी पालिकेचे अभियंते आणि अधिकाऱ्यांना बोलावून सुविधा आणि विकासकामे करण्याचे निर्देश दिले. तत्काळ आराखडा सादर करून कामे हाती घेण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या. येत्या काही दिवसांतच या परिसराचा चेहरा मोहरा बदललेला असेल, असा आशावाद देखील अशोक इंगळे यांनी व्यक्त केला.
मोक्षधाम परिसरात मोठे प्रवेश द्वार उभारण्यात येणार आहे. सुसज्ज अशी पार्कींगची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासह अंतर्गत रोड आणि रस्त्यांचे बांधकाम होणार आहे, नवीन दहन पिंजरे बसविण्यात येणार आहेत. पिण्याच्या शुद्ध पाण्याकरिता आरओ मशीन लावण्यात येणार आहेत. छोटी बाग तयार करण्यात येणार आहे. नाल्यावर पिचिंग आणि सुरक्षा भिंत तयार करण्यात येणार आहे. विद्युत व्यवस्था, खांब बसविण्यात येणार असून रंगरंगोटी आणि स्टीलच्या रेलिंग बसविण्यात येणार आहेत.