पाण्याच्या शोधात उष्माघाताने वन्यप्राण्यांचा होतोय मृत्यू

0
51
गोंदिया,दि.09-तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहे. परिणामी तलावांच्या जिल्ह्यातच यंदा एप्रिल महिन्यातच पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने पाणीे टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.यावर्षी तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झपाट्याने होत आहे.त्यामुळेच जंगलातील वन्यप्राण्यांना पाण्यासाठी गावाकडे धाव घेण्याची वेळ आली असून पाण्याअभावी व उष्णतेच्यादाहकतेमुळे रानगव्यासारख्या वन्यप्राण्यांना जिव सुध्दा गमावण्याची वेळ आल्याचे नुकतेच देवपायलीच्या जंगलात मृत रानगव्यावरुन दिसून आले आहे.तरीही प्रशासन मात्र आम्ही वन्यप्राण्यासांठी पाण्याची व्यवस्था केल्याचे दाखवित असलेले आकडे संशयास्पद वाटू लागले आहेत.
नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात २५६ पाणवटे असून त्यापैकी ७८ नैसर्गिक स्त्रोताचे तर १५४ कृत्रीम पाणवटे आहेत.२४ तलाव ही या क्षेत्रात  असून १५४ कृत्रीम पाणवट्यात पाणीपुरवठा व्हावा यासाठी १४१ हातपंप तयार केलेले आहेत.त्यापैकी ११० हातपंप है सौरऊर्जेवर चालणारे आहेत.१३ पाणवट्यामध्ये ०३ टँकरच्या माध्यमातून पाण्याची सोय केली जात असून वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत नसल्याचे वन्यजीव विभागाचे म्हणने आहे.तर काही वन्यप्रेमींनुसार गेल्या ८-१० दिवसापुर्वीपर्यंत कुठेच पाण्याची सोय करण्यात आलेली नव्हती जेव्हा वन्यप्रेमींनी ओरडण्यास सुरवात केली तेव्हा कुठे टँकर सुरु झाल्याचे म्हणने आहे.जे २४ तलाव व्याघ्रप्रकल्पाच्या परिसरात आहेत त्यापैकी अनेकांची पाण्याची पातळी खालावली असून काही कोरडे सुध्दा झाल्याचे बोलले जात आहे.
मानवासह वन्यप्राण्यांची सुध्दा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे. मात्र गोरेगाव तालुक्यातील बंड तलाव वन्यप्राण्यांसाठी वरदान ठरत आहे. या तलावात मे महिन्यातही भरपूर पाणी शिल्लक असून वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी हा तलाव महत्त्वपूर्ण ठरत आहे.या तलावाची निर्मिती १९६५ मध्ये करण्यात असून दोन हेक्टर परिसरात या तलावाचा विस्तार आहे. मागील ५५ वर्षांपासून हे तलाव कधीच आटले नसल्याचे या परिसरातील गावकरी सांगतात.विशेष उन्हाळ्यात या तलावावर पाणी पिण्यासाठी मोठ्या वन्यप्राणी येतात.
नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील थाटेझरी गावाजवळील मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे. तर यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.