जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते रोशनी पवारचा सन्मान

0
16

वाशिम, दि. ०९ : विहिरीत पडलेल्या बालकाला वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या रोशनी पवार या मुलीचा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी बुधवारी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. मानोरा तालुक्यातील गिर्डा गावातील रोशनी इयत्ता सातवीमध्ये शिकते. जिल्हाधिकाऱ्यांनी तिच्या शौर्याचे कौतुक केले, मुली सुद्धा मुलांप्रमाणेच धाडसी आणि शूर असतात, हे या प्रसंगावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे पालकांनी मुलगा-मुलगी भेद न करता मुलींनाही चांगले शिक्षण तसेच समानतेची वागणूक दिली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. रोशनीला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.यावेळी महिला व बाल विकास अधिकारी सुभाष संतराम राठोड यांच्यासह रोशनीचे कुटुंबीय उपस्थित होते.

रोशनी शालेय शिक्षण घेण्यासोबतच आईला घरकामात मदत करते. त्याचाच एक भाग म्हणून २८ मार्च रोजी रोशनी गावातील विहिरीवर नेहमीप्रमाणे घरचे कपडे धुण्यासाठी गेली असता विहिरीजवळ खेळत असलेला रोशन इंदल जाधव हा बालक तोल जावून अचानक विहिरीत पडला. उपस्थित अन्य कपडे धुणाऱ्या महिलांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्या बालकाची बहिणही कपडे धुण्यासाठी आली होती, भाऊ विहिरीत पडलेला पाहून ती गोंधळली आणि गावात लोकांना बोलावण्यासाठी तिने धाव घेतली. तोपर्यंत रोशन पाण्यात गटांगळ्या खात होता. यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रोशनी पवार विहिरीच्या कड्यांच्या सहाय्याने विहिरीत उतरली आणि रोशनचा हात पकडून त्याला खेचले. त्याचा प्राण ग्रामस्थ येईपर्यंत त्या बालकाला तिने एकटीने बाहेर काढले. विशेष म्हणजे रोशनीला पोहता येत नसून ती पहिल्यांदाच विहिरीत उतरली आणि रोशनचा जीव वाचविला.या घटनेची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. राठोड यांना समजताच त्यांनी रोशनीची तिच्या घरी जावून भेट घेतली व तिचे कौतुक केले. तसेच तेथील ग्रामस्थांना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या बाबतीत माहिती देवून मुलीचे समाजातील महत्व समजावून सांगितले.