शंभर वर्षे जुनी बोडी बुजविण्याचा कंत्राटदाराचा प्रयत्न

0
26

गोंदिया,दि.12 : अलीकडे भूजल पातळी वाढविण्यासाठी शासनस्तरावर जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाण्याचे स्त्रोतांचे खोलीकरण केले जात आहे. मात्र, रावणवाडी येथे कंत्राटदाराकडून सर्रासपणे शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा फज्जा उडविला जात आहे. जमीनदोस्त करण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा मलबा १०० वर्ष जुन्या बोडीत टाकून त्यांला बुजविण्याचा प्रयत्न होत आहे. या सर्व प्रकारापासून स्थानिक स्वराज्य संस्था अनभिज्ञच आहे. याकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व आरोग्य अधिकारी लक्ष देऊन सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत घालून कारवाई करणार काय? याकडे रावणवाडीवासीयांचे लक्ष लागले आहे.
रावणवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे १०० वर्ष जुनी एकमात्र बोडी आहे. ही बोडी गावातील पाण्याचे स्त्रोत म्हणजेच जलस्तर टिकविण्यासाठी महत्त्वाची ठरते. मात्र, या बोडीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आजघडीला बोडीचे सपाटीकरण होवू लागले आहे. तर दुसरीकडे जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असली तरी या बोडीचे खोलीकरणाचे काम देखील झाले नाही. असे असले तरी या बोडीचे पाणी गावातील जनावरांची तहान भागविण्यासाठी कामी येत आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत जमीनदोस्त करुन नवीन इमारत बांधकामाला मंजूरी मिळाली आहे. कंत्राटदाराकडून जुनी इमारत जमिनदोस्त करण्याचे काम सुरु केले आहे. मात्र त्यापासून निघणाऱ्या मलब्याची विल्हेवाट कंत्राटदार आपल्या मनमर्जीने बोडीमध्ये करीत आहे.यामुळे बोडीला मलब्याच्या माध्यमातून बुजविण्याचा प्रयत्न होत असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.याप्रकारावर आळा घालण्यात यावा, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.

जुन्या इमारतीला जमिनदोस्त करुन त्याचा मलबा नजीकच्या बोडीमध्ये टाकला जात आहे. या संदर्भातील माहिती किंवा परवानगी सदर कंत्राटदाराने ग्रामपंचायतीकडून घेतलेली नाही.बोेडीमध्ये मलबा टाकून सपाटीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी कंत्राटदाराला जाब विचारण्यात येईल.
– एल.बी.चिंधालोरे, ग्रामविकास अधिकारी, रावणवाडी.