फुलचूर पेठ येथे आरोग्य उपकेंद्राला मंजुरी

0
17

गोंदिया,दि.१३:-शहरालगतच्या फुलचूर पेठ व परिसरातील लोकसंख्या लक्षात घेऊन गोंदिया जिल्हा परिषदेने प्राथमिक उपकेंद्राच्या निर्मितीचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले होते. विचाराधीन प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून, फुलचूर पेठ येथे प्राथमिक उपकेंद्राची पदनिर्मिती तसेच इमारतीचे बांधकाम करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने (दि.१0) शासन निर्णय निर्गमित करून दिले आहे.
गोंदिया शहरलगतच्या फुलचूर पेठ व परिसरातील लोकसंख्येच्या आधारावर आरोग्य उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. यासंदर्भात स्थानिक आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन राज्य शासनाच्या आरोग्य विभागाशी पाठपुरावा केला. दरम्यान, आरोग्य विभागाने ९ मे रोजी शासन निर्णय निर्गमित करून फुलचूर येथे विशेष बाब म्हणून आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी विहित पद्धतीने जागा अधिगृहित करून त्या जागेवर प्रशस्त इमारतीचे बांधकाम व उपकेंद्रासाठी पदनिर्मितीबाबत स्वतंत्र कारवाई करण्याचे निर्देशही शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आले आहे.एकंदरीत या निर्णयामुळे फुलचूर पेठ व परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ घेता येणार आहे. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश आल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभारही मानले आहे.