दारुबंदीसाठी फुलचूर येथे मतदानात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

0
19
गोंदिया,दि.14: शहरालगत असलेल्या फुलचूर येथील महिलांनी दारुबंदीसाठी पुढाकार घेतला आहे. दारुबंदी संदर्भात निर्णय घेण्यासाठी आज मंगळवारी (दि.१४) गावातील महिलांचे मतदान घेण्यात येत आहे. गावातील महिलांनी दारुची उभी बाटली आडवी करण्याचा निर्धार केला केला असून मतदानात मोठ्या संख्ङ्मेने महिलांनी सहभाग नोंदविला. सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरवात झाली आहे.  २४०० महिला मतदानात सहभागी होणार आहेत.त्यापैकी ५१ ट्क्के मत आडवी बाटलीच्या बाजूने पडले. तरच दारुबंदीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
फुलचूर गाव परिसरात जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. हे गाव मुख्य मार्गावर असल्यामुळे या गावात परवानाधारक देशी व विदेशी दारु दुकाने आहेत. या गावात एक देशी दारु दुकान आहे. तर ५ बार हॉटेल आहेत. त्यामुळे गा गावात नेहमीच रात्री उशिरापर्यंत तळीरामांची गर्दी पहावयास मिळते. यामुळे फुलचूर गावात महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच व्यसनाधिनचेही प्रमाण वाढत चालले आहे.
या सर्व प्रकारावर आढा घालण्यासाठी फुलचूर येथील महिलांनी खमारी येथील महिलांच्या धर्तीवर दारु बंदीसाठी एल्गार पुकारला आहे. गावातील महिलांनी दारुबंदी समिती स्थापन करुन फुलचूर गावात दारुबंदी करण्यासाठी जनजागृती केली. जिल्हा प्रशासनाकडे फुलचूर गावातील परवानाधारक दारु दुकाने हटविण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली. मात्र नियमान्वये दारुबंदीसाठी ५० टक्के महिलांचा सहभाग असणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने महिलांच्या मागणीची दखल घेत काही दिवसापुर्वी दारुबंदीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी महिलांचे मतदान घेण्याचा निर्णय घेतला.