सर्व विभागांनी मान्सून पुर्व तयारीचे सुक्ष्म नियोजन करावे: जिल्हाधिकारी बलकवडे

0
18

गोंदिया,दि.14:: मान्सूनपुर्व तयारीच्या अनुषंगाने सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करुन समन्वय साधून कार्य करावे. तसेच अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीच्या परिस्थीतीला आटोक्यात ठेवण्यासाठी प्रत्येक विभागाने सतर्क रहावे अशा सूचना मान्सून पूर्व तयारीच्या बैठकीत जिल्हाधिकारी कादम्बरी बलकवडे यांनी सर्व विभागांना दिली आहे. सदर बैठक आज( दि. 14) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात  जिल्हाधिकारी डॉ.कादम्बरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
1 जून 2019 पासून मान्सून कालावधी प्रारंभ होणार असून सर्व विभांच्या तयारीच्या आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. ते पुढे म्हणाल्या की आपत्तीचे पूर्व नियोजन महत्वाचे असून जिल्हयातील 87 गावांमध्ये पूर परिस्थीतीचे संभाव्य धोके आहेत. मान्सून कालावधीत या गावांमध्ये उपाय योजना करणे संबंधी सुक्ष्म नियोजन करणे आवश्यक आहे. धनधान्य साठा, औषध साठा, आरोग्य पथक, पूर परिस्थीतीची सूचना, जिवनावश्क वस्तुंचा साठा व इतर तयारी येणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यास सोयीस्कर होईल.  सार्वजनिक बांधकाम विभागाला संरचना तपासणी (Structure Audit), नगर परिषद व नगर पंचायत तथा ग्राम पंचायत यांना त्यांच्या क्षेत्रात नाले,नाली सफाई, अतिक्रमण धारकांना तथा जीर्ण असलेल्या इमारतींना नोटीस देण्याचे निर्देश या वेळेस त्यांनी दिले.
सदर बैठकीत मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी , अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी , पोलिस उपअधिक्षक (गृह) सोनाली कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश राठोड जि.प. गोंदिया,  उपवन संरक्षक एस.युवराज, उपजिल्हाधिकारी भु-संपादन राहुल, खांडेभराड उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर ,रविंद्र राठोड, गंगाधर तळपादे, शिल्पा सोनाळे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे माहिती देतांना जिल्हाधिकारी म्हणाल्या की  जिल्हयात सरासरी 1327.49 मि.मी पाऊस पडतो तसेच गोंदिया जिल्हयाच्या बाजूला मध्यप्रदेश आणि छत्तीसगढच्या सीमा असून बालाघाट आणि राजनांदगाव जिल्हयात पडणारा पाऊस संजय सरोवर तथा शिरपूर धरणाच्या माध्यमातून जिल्हयात प्रवेश करतो. तसेच संजय सरोवर (मध्यप्रदेश) येथून सुटणारा विसर्गाजा पाणी 25 तासात वैनगांगा नदीच्या माध्यमातून बिरसोला संगम घाट (काटी) महाराष्ट्र येथे पोहोचतो. त्याच प्रमाणे शिरपूर देवरी येथून सुटणारा विसर्गाचा पाणी 27 तासात बाघनदीच्या माध्यमातून रजेगांव घाट पर्यंत येतो. या दरम्यान धरणातनू सोडलेल्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पूर परिस्थीतीला मात करण्याची सूचना जिल्हाधिकारी संबंधीतांना दिल्या.
वाट्सअप ग्रुप तयार करुन पूरपरिस्थतीच्या सूचना नागरीकांना देण तसेच पूर परिस्थीतीच्या वेळेस टाकाऊ वस्तुंचा प्रयोग करुन आपत्तीवर मात करण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. सदर बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रत्येक विभाग प्रमुखांना 24 तास नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिले. पर्जन्यमानाची आकडेवारी सर्व तालुक्यात दररोजी सकाळी 8 वाजेपर्यंत अद्यवत करण्याची सूचना दिली. या वेळेस सर्व तहसिलदार, महसूल विभाग/ आरोग्य यंत्रणा/ पोलिस विभाग/ शिक्षण विभाग/ बांधकाम विभाग /मध्यम प्रकल्प/ पाटबंधारे विभाग/ महावितरण विभाग/ दूरसंचार विभाग/ परिवहन विभाग/ नगर परिषद/नगर पंचायत आदि विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीत विषयांचे सादरीकरण  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.

सेल्फीचे मोह टाळा: जिल्हाधिकारी यांचे आवाहन
जिल्हाधिकारी यांनी धरण, तलाव, जलाशय, पुल या ठिकाणी सेल्फीचा मोह टाळण्याचे नागकीकांना आवाहन केले आहे. तसेच संबंधित विभागांना अशा धोक्याच्या ठिकाणी  योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. जीर्ण असलेले पुल, इमारत, धरण येथे रेडीयमचे सूचनेचे फलक लावण्याचे निर्देशीत करण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी  पुलावरुन पाणी वाहत असतांना पुल ओलांडण्याचा प्रयत्न करु नये अशा सूचना नागरीकांना देऊन पोलिस व महसूल यंत्रणेला योग्य कार्यवाही करुन कठडे लावण्याचे निर्देश दिले आहेत.