19 मे पर्यंत जिल्हा बंदचे माओवाद्यानी केले आवाहन,जांबिया परिसरात आढळले बॅनर

0
23

गडचिरोली,दि.16(विशेष प्रतिनिधी) -एट्टापल्ली तालुक्‍यातील सुरजागड पट्ट्यातील गट्टा व जांबिया परिसरात माओवाद्यांनी बॅनरमधून आठ नागरिकांची नावे लिहून नक्षल चळवळीविरुद्ध पोलिसांना मदत करणाऱ्यांना मृत्युदंड देण्यात येईल, असा मजकूर लिहिल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.तसेच 19 मे पर्यंत गडचिरोली जिल्हा बंदचे आवाहन केले आहे.जांबिया येथील शासकीय औद्योगिक संस्था,समाजमंदिरासह अनेक ठिकाणी बॅनर लावले आहेत.त्या बॅनरमध्ये गडचिरोली सी-सीक्स्टी कमांडो पोलीस पथकाबद्दल उल्लेख कऱण्यात आलेला आहे.तसेच 2 मे रोज़ी रामको व शिल्पा ध्रुवा या महीला माओवाद्याना खोटया चकमकीत मारल्याचा माओवाद्यानी बॅनर मध्ये आरोप केलेला आहे.पश्चिम सब झोनल गडचिरोली दंडकारण्य नावाने टाकलेल्या पत्रात सी 60 व सीआरपीएफ जवांनांना फासीवादी असल्याचा उल्लेख केला आहे.

हेडरी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयांतर्गत गट्टा येथील शिशिर रामचंद्र मंडल यांची  गेल्या आठवड्यात नक्षल्यांनी धारदार शस्त्रे व बंदुकीची गोळी झाडून हत्या केली होती. टिटोळा  या गावातील एका लग्न समारंभात स्वमालकीचे जनरेटर भाड्याने घेऊन गेलेल्या शिशिरचे नक्षल्यांनी आदल्या रात्री अपहरण केले होते. यावेळी नक्षल्यांनी शिशिर यांना बेदम मारहाण करून आणखी काही पोलिस खबऱ्यांची नावे विचारली होती. त्यानंतर मृतदेहावर एक पत्रक टाकून त्यात आठ नागरिकांची नावे लिहून पोलिस खबरींना अशाचप्रकारे धडा शिकविला जाईल, असा मजकूर लिहिला होता. तसाच मजकूर लिहिलेली पत्रके गट्टा व जांभिया परिसरात आढळली.माओवाद्यांकडून गेल्या काही दिवसांत पोलिस खबरीच्या नावाखाली नागरिकांच्या हत्या, विकास कामांवरील वाहनांची जाळपोळ व पोलिसांना लक्ष करून गोळीबार व बॉम्बस्फोट अशा घटना घडवून आणल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे. नक्षलवाद्यांनी विविध ठिकाणी लावलेले बॅनर व पोस्टर गट्टा पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले.