मुख्य बातम्या:

कुपोषण रोखण्यासाठीच ‘रोटा व्हायरस’ लस

भंडारा,दि.17 : जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत रोटा व्हायरसचे लसीकरण सर्वत्र मोफत करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील दरवर्षी ४० हजार बालकांना रोटाव्हायरस लसीचे सुरक्षा कवच लाभणार आहे. या लसीमुळे बालकांचे अतिसारापासून संरक्षण होणार असून दवाखान्यात दाखल होणाचे प्रमाण तसेच बालमृत्यूचे प्रमाणे कमी होण्यास मदत होणार आहे बालकांचे आरोग्य सुधारण्याबरोबरच पालकांचे होणारे आर्थिक नुकसानही टाळता येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.
आरोग्य विभागामार्फत रोटा व्हायरस लसीकरण कार्यशाळेचे आयोजन जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आले, त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुभाष जगताप, महिला व बालविकास अधिकारी मनिषा कुलसंगे, आयुक्त अन्न व पुरवठा अधिकारी आव्हाडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, नागपूर आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. प्रदीप गोगुलवार, उपस्थित होते.
रोटा व्हायरस हा अत्यंत संक्रमणजन्य विषाणू असून मुलांमध्ये अतिसाराचे सर्वात मोठे कारण आहे. या विषाणूमुळे भारतामध्ये दरवर्षी ४० लाख बालकांना दवाख्यान्यात उपचारासाठी दाखल करावे लागते. यामुळे दरवर्षी ७८ हजार मुले दगावली जातात. यात ५० टक्के मृत्यु हे मुलांच्या वयाच्या पहिल्या वर्षामध्ये होतात. ही रोटा व्हायरस लस अतिसार नियंत्रणासाठी एकमेव प्रभावी अशी लस आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यासाठी रोटा व्हायरस लस बाळाच्या जन्मानंतर सहा-दहा-चौदा आठवडयाच्या वयोमानात बाळाला देणे आवश्यक आहे. ही रोटा व्हायरस लस सर्व शासकीय दवाखान्यात, जिल्हा रुग्णालयात, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व लसीकरण सत्राच्या ठिकाणी मोफत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या आरोग्य विषयक कार्यशाळेला आरोग्याशी संबंधित एनएचएम, एचडब्ल्युसी व आरबीएसके तसेच सर्व आरोग्य कार्यक्रमाचे समन्वयक व सर्व प्रतिनिधींनी सहभागी होवून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. अशा कार्यक्रमात योग्य आईसीचा उपयोग करुन प्रचार करावा, वैद्यकीयय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी यांनी लस पाजणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करावे. सर्वांकडून प्रात्यक्षिक करुन कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी करण्याच्या शुभेच्छा त्यांनी उपस्थितांना दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी शुभेच्छा देवून प्रत्येक लसीकरण मोहिम राबविण्यात भंडारा जिल्हा अग्रेसर आहे. त्यामुळे आता रोटा व्हायरस लसीसंबंधी जनतेला जागृत करुन लाभार्थी आणि लससाठा यांचे नियोजन करुन लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात यावे, अशा सूचना केल्या.
डॉ. प्रदीप गोगुलवार यांनी रोटा व्हायरस सुविधा यशस्वी करण्यासाठी चार पायºयाचा समावेश असल्याचे सांगितले. प्रथम पायरीत रोटाव्हायरस गुण दोषासह जनतेत जनजागृती करण्यात येईल. दुसरी पायरी जिल्हयात रोटा व्हायरसमुळे कोणत्याही बालकाला दुष्परिणाम होवू नये यासाठी पर्यवेक्षण करण्यात येईल. तिसरी पायरी सर्व बालकांपर्यंत लस पोहचविणे हे उद्दिष्ष्ट राहील आणि चौथी पायरी लसीकरण करणाºया सर्व लोकांना प्रशिक्षण देऊनच लसीकरणाचे काम केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके यांनी प्रास्ताविकात सांगितले की जिल्हा परिषद भंडारातर्फे सन २०१४ पासून लसीकरण कार्यक्रमाद्वारे अनेक नव्या लसीची सुरुवात केली आहे. त्यात जागतिक आरोग्य संघटनेने सन २०१९ पासून रोटा व्हायरस सुविधा जनतेसाठी मोफत सुरु केल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत सर्व्हेलन्स वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजिद, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. माधूरी माथूरकर, तालुका अधिकारी डॉ.सचिन चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखील डोकरीमारे, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ, रविंद्र कापगते, यांनी विविध मुद्यांवर मार्गदर्शन केले.
संचालन डॉ. शांतीदास लुंगे यांनी तर आभार डॉ. निखील डोकरीमारे यांनी मानले. कार्यशाळेला वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हयातील संपूर्ण वैद्यकीय अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी डॉ. पंकजकुमार पटले, डॉ. श्रीकांत आंबेकर तसेच जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Share