पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा- डॉ.कादंबरी बलकवडे

0
56

गोंदिया,दि.२० : जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे. कोणत्याही नागरिकाला पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येवू नये यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजनबध्द पध्दतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
आज २० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणी टंचाईचा आढावा घेतांना डॉ.बलकवडे बोलत होत्या. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुनील कोरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.बलकवडे म्हणाल्या, पाण्याचे जे स्त्रोत आहे त्यामधून नागरिकांना शुध्द व स्वच्छ पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे. हे स्त्रोत दुरुस्त करुन त्याचे पुर्नजीवन करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. आवश्यक त्या वाड्या-वस्त्या आणि वार्डामध्ये पाण्यासाठी पाईप लाईन टाकण्याचे काम त्वरित करावे. गोंदिया शहरातील दलित वस्तीमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आहे, तेव्हा नगर परिषदेने पुढाकार घेवून तेथील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दयावे. शहरी भागात सर्वांना पाणी मिळावे यासाठी एक महिन्याच्या आत सर्व्हेक्षण करण्यात यावे. सार्वजनिक विहिरी पाण्याच्या दृष्टीने कशा उपयोगात आणता येईल तसेच बंद अथवा नादुरुस्त असलेल्या विंधन विहिरी दुरुस्ती करुन उपयोगात आणण्याचे देखील त्यांनी सूचविले.
ज्या स्त्रोतातून नागरिकांना पाण्याची उपलब्धता होते त्या स्त्रोताचा परिसर हा नियमीत स्वच्छ ठेवला पाहिजे असे सांगून डॉ.बलकवडे म्हणाल्या, शुध्द आणि स्वच्छ पाणी नागरिकांना मिळाले पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. ज्या यंत्रणांकडे स्त्रोताच्या देखभालीची जबाबदारी सोपविली आहे त्यांनी या कामात हयगय केल्यास संबंधित यंत्रणेच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यावर निलंबनाच्या अप्रिय कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येईल. भविष्यातील काळात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे. यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने पाण्याचा योग्य आणि काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याच्या पुर्नभरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागती करुन प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या ठिकाणी सद्यस्थितीत नाईलाजाने टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे तेथील पाण्याच्या स्त्रोताचे बळकटीकरण व आवश्यक त्या दुरुस्ती करुन पाणी पुरवठा पुर्ववत सुरु करावा व टँकरने पाणी पुरवठा बंद करावा. पाणी पुरवठा होत असलेल्या सार्वजनिक तसेच घरगुती नळाला टिल्लू पंप लावून जर कुणी पाणी घेत असतील तर अशांचे टिल्लू पंप जप्त करुन संबंधितांवर यंत्रणेने कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, ज्या स्त्रोतांमधून नागरिकांना पाणी उपलब्ध होते त्यामध्ये ब्लिचींग पावडर पुरेशा प्रमाणात टाकावे. त्यामुळे दुषित पाणी कुणाच्याही पिण्यात येवून त्यांना आजारांचा सामना करण्याची वेळ येणार नाही. ज्या योजना मंजुरीसाठी शासनाकडे पाठवायच्या आहेत त्या तातडीने शासनाने पाठवून मंजूरी मिळवून घ्यावी. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून ज्या नळ योजना तयार आहेत परंतू वीज जोडणी अभावी नागरिकांना पाणी मिळत नाही, तेव्हा डिमांड त्वरित भरुन वीज जोडणी करुन घ्यावी, त्यामुळे लवकरच पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. जी कामे प्रगतीपथावर आहेत ती तातडीने पूर्ण करुन पाणी पुरवठा सुरु करावा. पाण्याचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जे पाण्याचे दुषित स्त्रोत आहेत त्याचे निर्जंतुकीकरण करुन ते पाणी वापरण्यायोग्य व पिण्यायोग्य होतील याकडे विशेष लक्ष्य दयावे असे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दयानिधी म्हणाले, जिल्ह्यात विविध ठिकाणी नविन विंधन घेण्याचे ४३ प्रस्ताव होते, त्यापैकी ३९ प्रस्तावांना मंजूरी मिळाली असून २० कामे पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील २२० विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती करण्यात आली आहे. टप्पा-३ अंतर्गत १३६ नविन विंधन विहिरी घेणे, ९६२ विंधन विहिरींची विशेष दुरुस्तीची कामे प्रस्तावित आहेत. लघु नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत २२ विद्युत पंप दुरुस्ती व आश्रमशाळेअंतर्गत ६ असे एकूण २८ विद्युत पंप दुरुस्ती करण्यात आली आहे. सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ योजनेअंतर्गत २० कामे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरपरिषद, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात पाणी पुरवठा बाबतची सद्यस्थिती व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी श्री.जाधव यांनी तसेच संबंधित नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली. ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी दिली. तसेच जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.छप्परघरे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आर.पी.चंद्रिकापुरे यांनी सुध्दा त्यांच्या विभागामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
आढावा बैठकीला बाघ इटियाडोहचे कार्यकारी अभियंता एच.वाय.छप्परघरे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आर.पी.चंद्रिकापुरे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एच.बी.चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.आर.बी.शहारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजेश वासनिक, गोंदिया नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील, तिरोडाचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांचेसह तहसिलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी तसेच संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.