जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी

0
21

गडचिरोली, दि.20: 12- गडचिरोली – चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीच्या मतमोजणीच्या  ठिकाणास  निवडणूक निर्णय अधिकारी  तथा जिल्हाधिकारी  शेखर सिंह यांनी  भेट देऊन पाहणी केली.यावेळी अपर पोलिस अधीक्षक डॉ. मोहित गर्ग, अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे,  दामोधर नान्हे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी कल्पनानीळ तसेच संबंधीत नोडल अधिकारी उपस्थित होते.

 मतमोजणी  प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी  नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोपविलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी. मतमोजणीसाठी नियुक्त नोडल अधिकारी तसेच त्यांच्या पथकातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतमोजणीच्या अनुषंगाने दिलेल्या जबाबदारीची सविस्तर माहिती करुन घ्यावी, व आपली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडून मतमोजणीची प्रक्रिया यशस्वी करावी असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी सिंह यांनी टपाली मतपत्रिका मोजणी पथक, मतमोजणी मनुष्यबळ व्यवस्थापन पथक, साहित्य व्यवस्थापन पथक, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे सहाय्यक पथक, सिलींग पथक, मतमोजणी समन्वय व अहवाल संकलन पथक या पथकांचा सविस्तर आढावा घेऊन सूचना केल्या. त्याप्रमाणेच मतमोजणीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त, आरोग्य सुविधा, इंटरनेट सुविधा, मिडिया कक्ष, याबाबतही माहिती घेऊन संबंधित नोडल अधिकाऱ्यांना जबाबदारी व्यवस्थित पार पाडण्याचे निर्देश दिले. मतमोजणी केंद्रात मतमोजणीच्या दिवशी मोबाईल वापरण्यासभारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रतिबंध असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

  12 – गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघातील निवडणूकीची मतमोजणी 23 मे रोजी  सकाळी 8 वाजतापासून कृषी महाविद्यालय येथे होणार आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय 84 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी  800 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी सुरळीत पार पडावी यासाठी कृषी महाविद्यालयातील दोन मजल्यांचा वापर करण्यात येणार आहे. जवळपास प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीच्या 25 फेऱ्या  अपेक्षित आहेत. कमीतकमी वेळेत मतमोजणीच्या फेऱ्या व्हाव्यात, यासाठी पोस्टल व बायलेट मतमोजणीसाठी स्वतंत्र कर्मचारी असतील अशी माहिती यावेळी देण्यात आली.