भारतीय सैन्यात महिला सैनिक पोलीस भरती

0
14

वाशिम, दि. २४ : भारतीय सैन्यात प्रथमच महिला सैनिक पोलीस भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. अंबाला, लखनौ, जबलपूर, बेंगलोर आणि शिलॉंग येथे या भरतीचे आयोजन केले जाणार आहे. याकरिता www.joinindianarmy.com या संकेस्थळावर ८ जून २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज भाराने आवश्यक आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या महिला उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर प्रवेशपत्र पाठविले जाईल. प्रवेशपत्रामध्ये भरतीची तारीख, वेळ आणि ठिकाण कळविण्यात येईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

सैन्य भरतीमध्ये सोल्जर जी. डी. (जनरल ड्युटी) महिला सैनिक पोलीस या पदासाठी साडे सतरा ते एकवीस वर्षे वयोगटातील म्हणजेच १ ऑक्टोंबर १९९८ ते १ एप्रिल २००२ या कालवधीत जन्मलेल्या उमेदवार पात्र असतील. उंची किमान १४२ से.मी. असावी. तसेच ४५ टक्के गुणांसह इयत्ता १० वी उत्तीर्ण व प्रत्येक विषयात किमान ३३ टक्के गुण असणे आवश्यक आहे. सैन्य सेवेत असतांना मरण पावलेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींना भरतीसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे राहील. भरती वेळी महिला उमेदवार अविवाहित असणे आवश्यक आहे, परंतु सैन्य सेवेत असतांना मरण पावलेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींना ही अट लागू नाही. भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्याने सर्व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीकरिता www.joinindianarmy.com या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा ०११-२६१७३८४० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वाशिमचे सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.