जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जनजागृती रॅली

0
57

वाशिम, दि. ०१ : जागतिक तंबाखू नकार दिनाचे औचित्य साधून ३१ मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ए. व्ही. सोनटक्के व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सोनटक्के म्हणाले, भारतात तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग असलेल्या रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने भारतात प्रत्येक वर्षी सुमारे १० लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे सर्वांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

डॉ. आहेर म्हणाले, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे क्षयरोग, हृदय रोग व कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्वांनी या पदार्थ्यांच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

जिल्हा सामान्य रुग्णालय येथून सुरु झालेली जनजागृती रॅली शहरातून विविध ठिकाणहून बसस्थानकमार्गे पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. बसस्थानक व जिल्हा सामान्य रुग्णालय येथे तंबाखू विरोधी पथनाट्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आदित्य पांढरकर यांनी केले. सूत्रसंचालन राम सरकटे यांनी केले, आभार रामकृष्ण धाडवे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हाके, मनोज रत्नपारखी, डॉ. भाग्यवंत, राहुल कसादे यांनी प्रयत्न केले.