अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

0
11

गोंदिया : यावर्षी प्रथमच प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या 11 शाळांपैकी बोरगाव, मजिपूर, पुराडा, जमाकुडो व बिजेपार येथे इयत्ता पहिली पासून इंग्रजी माध्यम सुरु करण्यात येत आहे. तरी आदिवासी बांधवांनी   आपल्या पाल्यास नजिकच्या शासकीय आश्रमशाळेत प्रवेशित करावे.

 शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाने पुरविलेल्या सोई-सुविधा व सवलती पुढीलप्रमाणे आहेत. प्रवेश देतेवेळी विद्यार्थ्याचे वय 6 वर्षे पुर्ण झालेले असावे. विद्यार्थी हा आदिवासी समाजाचा असावा. विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षण व निवासाची व्यवस्था व मोफत पाठ्यपुस्तके. मुबलक पाण्याची सोय तसेच उतुंग इमारतीची सोय. मुले व मुलींसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, संडास बाथरुम पुरेशा प्रमाणात. मुलांच्या आवडीनुसार भोजनाची सोय. डीबीटी अंतर्गत वर्ग 1 ते 5 करीता 7500 रुपये, वर्ग 6 ते 9 करीता 8500 रुपये आणि वर्ग 10 ते 12 करीता 9500 रुपये विद्यार्थ्यांच्या थेट बँकेत देण्यात येते. मुलांच्या नास्त्याकरीता दूध, केळी, अंडी पोषक आहार दिल्या जातो. दैनिक मेनूनुसार भाजीपाला आणि महिन्यातून दोनदा चिकन/मटन दिल्या जाते. मोफत औषधोपचार व सोई-सुविधा, आठवड्यातून दोन दिवस ए.एन.एम.द्वारे आरोग्य तपासणी. पिण्यासाठी आरोचे पाणी उपलब्ध. स्वतंत्र संगणक कक्ष, ग्रंथालय, प्रयोगशाळा, खेळाचे मैदान उपलब्ध आहेत. मुला/मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने 24 तास पहारेकरी. उच्च शिक्षीत व अनुभवी शिक्षक वर्ग. मुलांचे मनोरंजनाकरीता स्वतंत्र सभागृह, टीव्हीची सुविधा, विविध स्पर्धा परीक्षांची तयारी केली जाते. आठवड्यातून एकदा मुला/मुलींचे समुपदेशन, मार्गदर्शन व संवाद.

तरी आपण आपल्या पाल्यास नजिकच्या शासकीय आश्रमशाळेत प्रवेश घेवून शासनाच्या सोई-सवलतींचा अवश्य लाभ घ्यावा. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांनी कळविले आहे.