आमदार राणांचा कामचुकार कंत्राटदाराला इशारा,काम पुर्ण करा अन्यथा मार खा

0
26

अमरावती(विशेष प्रतिनिधी)दि.08- जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदार संघातील विकास कामांसाठी निधी आणून ही, कंत्राटदाराच्या हलगर्जी कारभारामुळे कामे रेंगाळत असल्याचे दिसून येताच बडनेरा मतदार संघाचे  आमदार व युवा स्वाभीमानचे संस्थापक अध्यक्ष रवी राणा यांनी कंत्राटदाराला चांगलेच धारेवर धरले.एवढच नव्हे तर, उद्यापासून योग्य पद्धतीने कामे सुरू करा, अन्यथा तुम्ही जिथे दिसाल त्याच ठिकाणी मार खाण्याची तयारी ठेवा, असा सणसनीत इशाराच दिला.

राजपेठ येथून बडनेरा आणि दस्तुर नगरच्या दिशेने रेल्वेरुळावरून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यातील एका बाजूचे काम झाले असून त्यावरून वाहतूक सुद्धा सुरु झाली आहे. मात्र, दस्तुरनागरकडे जाणाऱ्या दुसऱ्याबाजूचे काम अनेक दिवसांपासून बंद असल्याची माहिती नागरिकांनी आमदाराला दिली.त्यानुसार शुक्रवारी(दि.07) आमदार रवी राणा यांनी महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह राजपेठ रेल्वे क्रॉसिंग येथील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी रेल्वे हद्दीतील काम वगळता कंत्राटदाराने आपले काम अर्धवट करुन बंद ठेवल्याचे निदर्शनास आल्याने राणा यांनी कंत्राटदाराचा खरपूस समाचार घेतला.कामावरील मजूर निवडणुकीमुळे गावाकडे गेल्याचे कारण, कंत्राटदार आशिष चाफेकर यांनी सांगताच राणा यांनी त्यांची खरडपट्टी काढली. निवडणूक होऊन एक महिना झाला. घर बांधायला चाळीस मजूर लागतात आणि तुम्ही पुलाचे काम चाळीस कामगारांच्या भरोशावर करत आहात. मी शासनाकडून निधी आणून दिला. रेल्वेची परवानगी आणून दिली आणि तुम्ही नको ती कारणे सागंता असे म्हणत मला उद्यापासून काम सुरू झालेले दिसले नाही तर तुम्ही दिसेल त्या ठिकाणी मारणे सुरू करीन असा दम आमदार राणा यांनी कंत्राटदाराला दिल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.