वैष्णवी हिंगे व प्रतीक्षा भंडारा जिल्ह्यात प्रथम

0
22

भंडारा,दि.९ः-नागपूर विभागीय शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत भंडारा जिल्ह्याचा निकाल ६५.९८ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील १७ हजार ५९0 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ११ हजार ६0७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १६७६ विद्यार्थी प्रविण्य श्रेणीत तर ५0५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली. ७४.५६ मुली उत्तीर्ण झाल्या तर मुलांचे उत्तीर्णतेची टक्केवारी ५७.८६ आहे. यावर्षी जिल्ह्यातील ३४ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.दहावीच्या परीक्षेत येथील जेसीस कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी वैष्णवी विजय हिंगे आणि प्राईड कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी प्रतीक्षा प्रमोद बेदपुरिया समान ९५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आल्या आहेत.
दहावीच्या निकालात जेसीस कॉन्व्हेंट शाळेचा निकाल ९४.८४ टक्के लागला आहे तिच्या या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या रंजना दारवटकर शाळेचे संस्थाचालक मुकेश पटेल, मोहन निर्वाण, कल्याणमल भलगट, महेश पांडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे. सेंट पॉल इंग्लिश हायस्कूलचा निकाल ९३.४७ टक्के लागला असून १३ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तन्मयी कुंबलवार ९४ टक्के घेऊन शाळेतून प्रथम आली. तर आदित्य साठवणे ९२ टक्के आणि निधी कुसूमबिराज ८८ टक्के घेऊन तृतीय आली आहे. आदित्य साठवणे या विद्यार्थ्याला गणित या विषयात १00 पैकी १00 गुण मिळाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच मुख्याध्यापक नितीन सुकारे, शिक्षक, छाया कावळे, छाया देवघरे, शुभांगी निमकर , सुबोध गोस्वामी, आशिष भोंगाडे यांना दिले आहे.

भंडारा जिल्ह्यातील २८३ शाळांचे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी सहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात जवाहरनगर येथील आॅर्डीनन्स फॅक्टरी सेकंडरी स्कुल, तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथील सावित्रीबाई मेमोरियल विद्यालय, साकोली येथील कृष्णमुरारी कटकवार इंग्लीश हायस्कुल, पवनी येथील पवन पब्लिक स्कुल, लाखनी तालुक्यातील गडेगाव येथील हायसिंथ लिटल फ्लावर स्कुल आणि लाखांदूर येथील विद्या विहार मंदिरचा समावेश आहे. तर लाखनी तालुक्याचा निकाल ७२.५७, भंडारा ७१.३७, साकोली ६९.१६, पवनी ६४.११, लाखांदूर ६२.३८, तुमसर ६०.९५, मोहाडी ५९.७१ टक्के आहे.
नानाजी जोशी महाविद्यालय शहापूरचा निकाल ७८.२0 टक्के लागला. प्रथम श्रेणीत १३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रज्योत गिर्‍हेपुंजे ८९.६0 टक्के गुण घेऊन प्रथम, प्रज्ञा तिरबुडे ८९.४0 टक्के घेऊन द्वितीय तर ९0.२0 टक्के गुण घेऊन आदित्य मोथरकरने विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकाविला.