खा.मेंढेनी घेतला नवोदयचा विषय मार्गी लावण्यासाठी पुढाकार !

0
32

भंडारा,दि.९ः-जवाहर नवोदय विद्यालय विविध विषयांना घेऊन ते मार्गी लावण्याच्या दृष्टीने खा.सुनील मेंढे यांनी स्वत: पुढाकार घेत वरिष्ठ अधिकार्‍यांसह पाचगाव येथे ७ जून रोजी बैठक घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. पालकांच्या पूर्ण ८0 विद्यार्थ्यांच्या निकाल घोषित करण्याच्या भूमिकेला समजून घेत त्यांनी आधी ४0 व नंतर ४0 असा दोन टप्प्यात निकाल घोषित करण्याचे निर्देश नवोदय विद्यालय प्रशासनास दिले.
जवाहर नवोदय विद्यालय प्रशासनाने केवळ भंडारा जिल्हा वगळता इतर सर्व ठिकाणचे निकाल घोषात केल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. नवोदयच्या एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने खा.सुनील मेंढे यांनी पाचगाव येथे निमार्णाधीन असलेल्या नवोदयच्या इमारत परिसरात बैठकीचे आयोजन केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष तथा तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, सरपंचा सिमा रहांगडाले, जि.प.सदस्य रामराव कारेमोरे, पं.स. सदस्य निशा कळंबे, महेश कळंबे, तुमसरचे उपविभागीय अधिकारी टोणगावकर, तहसीलदार विजय देशमुख, केंद्रीय बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गुप्ता, विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र राऊत तसेच गावकरी व पालक प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान प्राचार्य पालकांची बाजू ऐकूण घेतल्यानंतर खा.सुनील मेंढे यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याच दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. खासदारांनी निर्देश दिल्यानुसार कंत्राटदाराने मुलांचे वस्तीगृह आणि वर्गखोल्या ३१ ऑगस्ट पयर्ंत तयार करून देण्याचे आश्‍वासन दिले आहे. जुन्या आणि नवीन ४0 विद्यार्थ्यांची राहण्याची व इतर सुविधांची व्यवस्था यामुळे होणार असून ४0 विद्यार्थ्यांचा निकाल तात्काळ घोषित करण्याचे निर्देश खासदारांनी दिले. उर्वरीत ४0 विद्यार्थ्यांचा निकाल हा राहण्याची व्यवस्था झाल्यानंतर घोषित करून त्यांनाही याच सत्रात प्रवेश देण्याचे निर्देशही खा.सुनील मेंढे यांनी दिले. कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी नवोदय प्रशासनाने घ्यावी, असेही ते म्हणाले. उपलब्ध असलेला शिक्षक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था अशा सर्वच विषयांचा आढावा खासदारांनी घेतला.