पेसा कायद्याच्या साहाय्याने गाव व्यसनमुक्त करा : डॉ. अभय बंग

0
20

गडचिरोली,दि.09,  : आदिवासीबहुल एटापल्ली तालुक्‍यात मोहाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. आदिवासी संस्कृतीचा भाग म्हणून मोहाची दारू घरोघरी बनविली जाते. पण, याच दारूमुळे आरोग्याचे अनेक प्रश्‍न तयार झाले आहेत. त्याचबरोबर खर्रा हा विषारी पदार्थही मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. संविधानाने पेसा कायद्याद्वारे संसदेलाही नसतील तेवढे अधिकार गावांना दिले आहेत. या कायद्याचा वापर करून ग्रामसभेद्वारे निर्णय घेऊन दारू आणि खर्रा गावांतून हद्दपार करा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले.

मुक्तिपथच्या माध्यमातून गावागावांत गाव संघटनांद्वारे दारू आणि खर्राबंदीसाठी प्रयत्नशील असलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी एटापल्ली येथे गोटूल सांस्कृतिक भवनात तालुका मुक्तिपथ कार्यालयाद्वारे तालुकास्तरीय व्यसनमुक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शक म्हणून डॉ. बंग बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिरामण वरखडे, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी, संवर्ग विकास अधिकारी किशोर गझलवार, पोलिस उपनिरीक्षक डहाके, पंचायत समिती सभापती बेबीताई लेखामी उपस्थित होते.या वेळी खर्रा या पदार्थामुळे होत असलेले नुकसान सांगणारा “यमराजाचा’ फास हा चित्रपट दाखवून चर्चा करण्यात आली. संचालन संतोष सावळकर यांनी केले.
गोंड आदिवासी समाजात धार्मिक कार्यात मोहाची दारू हवी, असा अपप्रचार अनेक वर्षांपासून वारंवार करण्यात आला आहे. पण, धर्माच्या कोणत्याही पुस्तकात देवपूजेसाठी मोहाची दारू हवी, असा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे मोहाची दारू देवपूजेला हवी हा अपप्रचार थांबविणे गरजेचे असल्याचे हिरामण वरखडे म्हणाले.आभार मुक्तिपथ तालुका संघटक किशोर मल्लेवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी तालुका उपसंघटक राजेंद्र भसारकर, प्रेरक रवींद्र वैरागडे आणि किशोर येमुलवार यांनी सहकार्य केले.