विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी केले काळी फित लावून काम

0
15

गडचिरोली,दि.11 : अकृषी विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचना लागू कराव्या, या प्रमुख मागणीसाठी गोंडवाना विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी काळी फित लावून आंदोलन केले.
विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचना लागू कराव्या, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये रद्द करण्यात आलेले शासन निर्णय पूर्ववत लागू करावे, नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ द्यावा इत्यादी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटनेने आपल्या मागण्यांसाठी यापूर्वी ३ जून रोजी कुलगुरु व शिक्षण संचालकांना निवेदन दिले होते. परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने आज कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाजात सहभाग घेतला. सुमारे ८० कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. १२ जूनपर्यंत काळी फित आंदोलन, १८ जूनला विभागीय सहसंचालक, तर २५ जूनला शिक्षण संचालकांच्या कार्यालयावर मोर्चा आणि २९ जूनला एक दिवसाचा लाक्षणिक संप, त्यानंतर जुलै महिन्यात बेमुदत संप केला जाणार असल्याचे कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.