उन्नत शेती, समृद्ध शेतकरी कृषि यांत्रिकीकरणमधून अनुदानावर कृषि अवजारांचा पुरवठा

0
474
  • ३० जून पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

वाशिम, दि. १२ :  ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ मोहिमेंतर्गत चालू वर्षी कृषि विभागामार्फत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित कृषि अवजारांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना स्वत:च्या मालकी हक्काचे कृषी यंत्र सामग्री व अवजारे खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्ह्यात कृषी यांत्रिकी उपअभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित कृषि अवजारांसाठी ३० जून २०१९ पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत.

शेतकऱ्यांना अनुदानावर लहान व मोठा ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, मोगडा (कल्टीव्हेटर), पावर टिलर, रिपर, रिपर कम बाईंडर, दालमिल व पूरक यंत्रसंच, ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र, मिस्ट ब्लोअर, सबसॉईलर इत्यादी कृषि अवजारे घेता येणार आहेत.

ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना किमतीच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १ लाख २५ हजार रुपये व इतर शेतकऱ्यांना किमतीच्या ४० टक्के किंवा जास्तीत जास्त १ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्प व महिला शेतकऱ्यांसाठी अवजारांच्या किंमतीच्या ५० टक्के व इतर शेतकऱ्यांसाठी ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

कृषि यांत्रिकीकरणाकरिता विविध योजनेंतर्गत जिल्ह्यास प्राप्त होणाऱ्या आर्थिक लाक्षांकाच्या मर्यादेत शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल. प्रत्येक अवजारासाठी शेतकऱ्यांनी विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या अवजारास जास्त अनुदान आहे, ते अनुदान देण्यात येईल. शेतकऱ्यांना एका वेळी एकाच यंत्रासाठी किंवा अवजारासाठी अनुदान देय आहे. कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या अर्जाच्या नमुन्यात अटी व शर्तीच्या अधीन राहून इच्छुक शेतकऱ्यांनी ३० जून  २०१९ पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावेत. जिल्ह्याला प्राप्त आर्थिक लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थी निवड तालुका हा घटक मानून सोडत पद्धतीने ५ जुलै २०१९ रोजी तालुकास्तरावर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा अथवा कृषि विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.