खासगी रुग्णालय व कॉन्व्हेंटची लूटमार थांबवा

0
17

नागपूर,दि.14ः- शहरातील गोर-गरिब पालक वर्गाकडून शिक्षणाच्या नावाखाली कॉन्व्हेंट, खासगी शाळा, महाविद्यालय अवाढव्य फीस वसुली करतात. तसेच रुग्णसेवेच्या नावाखाली रुग्णालय संचालक रुग्णांना ग्राहक समजूनच लुबाडत असल्याने शहरात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहे. या लुटमारीवर जिल्हा प्रशासनाने अंकुश निर्माण करावा, या मागणीकरिता गुरुवारी (१३ जून) नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

नागरिकांच्या चाललेल्या लुटमारीवर जिल्हा प्रशासनाने वेळीच अंकुश निर्माण करावा, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे मागणी केली. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेस नागरिकांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशाराही शिष्ठमंडळाने दिला. शिष्टमंडळात सतिश इटकेलवार, कादिर शेख, रुद्र धाकडे, जावेद हबीब, राजू नगराळे, रियाज सय्यद, महेंद्र भांगे, शैलेंद्र तिवारी, अलका कामडे आदिंचा समावेश होता.
निवेदनानुसार, गेल्या काही वर्षांपासून शहरात मोठय़ा प्रमाणात खासगी दवाखाने तसेच कॉन्व्हेंट उघडण्याकरिता शासनाने संस्था संचालकांना परवाने वाटले. मात्र, परवाने मिळविताना शासनाने काही अटी शर्तीने पालन करण्याचे यांच्यावर बंधने टाकण्यात आले. परंतु, पैशाच्या हव्यासापोटी दोन चार डॉक्टर मिळून एखादे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उघडून दुकानदारी थांटल्यागत रुग्णालयात येणार्‍या रुग्णाकडील पैशे संपेपर्यंत त्याला लुबाडण्याचे प्रकार समोर येत आहे. अशा प्रकारामुळे नागरिकांना आयुष्यभर एकएक पैसा जमवून बनविलेले घर, जमीन विकण्याची वेळ येत आहे. असाच काहीसा प्रकार शिक्षणाच्या नावाखाली बहुउद्देशिय संस्थेची नोंदणी करून गल्ली बोळात कॉन्हेंट उभारली आहे.
इंजिनियरींग करायला पालकांना खर्च येत नाही. त्यापेक्षा अधिक नर्सरी ते केजी २ पर्यंत पाल्यांवर पालक वर्गांचा खर्च होत आहे. शासकीय शाळा शहरात नगण्य राहिल्या असल्याने पालकांनाही अशा शाळांशिवाय पर्याय राहत नाही. खासगी रुग्णालय तसेच कॉन्हेंट उभारण्यापूर्वीच्या शासकीय नियम व अटींचे संस्था संचालक पालन करतात की सर्रास लूट चालविली आहे, हे पाहणारी यंत्रणा शहरात कुचकामी ठरत आहे.