जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुुरेपुर प्रयत्न करणार : खा. सुनिल मेंढे 

0
20

गोंदिया,दि.15 : ज्या विश्वासाने जनतेने निवडुण दिलेले आहे त्या विश्वासावर खरे उतरून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास या ब्रिद वाक्याप्रमाणे कार्य करायचे आहे. अंत्योदयाच्या तत्वावर चालून अंतिम घटकापर्यंत विकासाला घेऊन जायचे आहे. असे प्रतिपादन नवनिर्वाचित खासदार सुनिल मेंढे यांनी केले.
ते १३ जून रोजी अग्रसेन भवन येथे भारतीय जनता पार्टी गोंदिया ग्रामीण व शहर मंडळातर्फे आयोजित आभार मेळाव्यात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, नगराध्यक्ष अशोक इंगळे, प्रदेश कार्यकारीनी सदस्य विनोद अग्रवाल, न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा, जि.प. सभापती शैलजा सोनवाने, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम,  दिपक कदम, संपर्क प्रमुख संजय कुलकर्णी, धनंजय तुरकर, पन्नालाल मचाडे, परसराम हुमे आदि उपस्थित होते.
यावेळी खासदार सुनिल मेंढे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुढे बोलतांना खा. मेंढे म्हणाले की मी, नेता नसून आपल्या सारखा एक कार्यकर्ता आहे. जी जवाबदारी मिळालेली आहे, त्यासाठी जनतेचे कार्य करणे हे आपले परम कर्तव्य आहे.  कुठलीही समस्या असो माझ्याशी संपर्क करावे, भंडारा येथे जनसंपर्क कार्यालय असून लवकरच गोंदिया येथे जनसंपर्क कार्यालय सुरू करणार आहे. भंडारा – गोंदिया लोकसभा क्षेत्र मोठा असून प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभा निवडणूकीत कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेऊन हा विजय मिळविला आहे. तशीच मेहनत भविष्यातील विधानसभा निवडणूकीसाठी घ्यावी.  सध्या जिल्हा परिषद आसोलीची निवडणूक सुरू असून कार्यकर्त्यांनी विजय संपादन करण्यासाठी पूर्ण ताकदीनीशी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष पटले यांनी आपल्या मार्गदर्शनातून कार्यकत्यांना संबोधित करतांना सांगितले की मिळालेल्या यशावर हुरडुन न जाता आपले बुथ मजबुत करण्यासाठी सातत्याने कार्य करावे. याप्रसंगी विनोद अग्रवाल यांंनी सुध्दा मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन दिपक कदम यांनी तर आभार मुकेश चन्ने यांनी मानले. यावेळी नगर सेवक, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, सरपंच, पदाधिकारी  व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.