नदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा दुष्काळ मुक्त करू-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
15

नवी दिल्ली, 15 : केंद्र आणि राज्यशासनाच्या मदतीने नदी जोड प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र पुढील पाच वर्षात दुष्काळ मुक्त करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.येथील श्रमशक्ती भवनात आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते. या बैठकीनंतर श्री. फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.

            राज्यातील दुष्काळ निवारणासाठी करण्यात येणा-या उपाय योजनांमध्ये नदी जोड प्रकल्पाची महत्वपूर्ण भूमिका असून केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून गोदावरी खो-यात जास्तीत-जास्त पाणी आणण्याचे नियोजन आहे. या संदर्भात आज केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना माहिती दिली असून लवकरच या संदर्भात सविस्तर सादरीकरणही देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खो-यात पाणी आणून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करता येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

            केंद्र शासनाने दुष्काळ निवारणासाठी गेल्या ५ वर्षात महाराष्ट्राला उत्तम सहकार्य केले असून येत्या काळातही केंद्र शासनाच्या सहाय्याने राज्यात दुष्काळ निवारणासाठी ठोस पावले उचलण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या निती आयोगाच्या बैठकीतही पाणी , दुष्काळ आणि शेती विषयक प्रश्नांवर चर्चा होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.निती आयोगाच्या बैठकीत सहभाग घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यासह  पेट्रोलियम व गॅस तथा स्टील मंत्री धर्मेद्र प्रधान आणि गृहनिर्माण व शहरी विकास , नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री  हरदिपसिंह पुरी यांचीही भेट घेतली.