मुख्य बातम्या:

विजय वड्डेटीवर विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते, विरोधकांत एकमत

मुंबई दि.१६ ः: पावसाळी अधिवेशनाची सुरुवात सोमवार (ता. १७ जून) पासून होत असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक आज सकाळी ११ वाजता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर पार पडली. यात बैठकीत काँग्रेसचे आमदार विजय वड्डेटीवार यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबत एकमत झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिली. याबाबत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे मागणी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ,माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा गटनेता आमदार विजय वडेट्टीवार, शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख, विधानसभा उपनेता आमदार नसीम खान, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, सपाचे नेते आमदार अबु आझमी, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार कपिल पाटील, आमदार भास्कर जाधव,आमदार हेमंत टकले, आमदार शशिकांत शिंदे, विधानपरिषदेतील गटनेते शरद रणपिसे, आमदार रामहरी रुपनवर आदी नेते उपस्थित होते.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरील B – ४ या शासकीय निवासस्थानी सकाळी ११ वाजता विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक सुरू झाली. यात राज्यातील दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, शिक्षणातील गोंधळ, आरक्षणाचे रखडलेले प्रश्‍न आदी राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच या मुद्यांवरून विरोधी पक्ष राज्य सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे. तसेच दोन आठवडे चालणा-या पावसाळी अधिवेशनातील रणनिती ठरवण्यात आली.

Share