रापम अधिकाऱ्यांच्या बचावासाठी तक्रारी गहाळ केल्या -नरेश जैन

0
21

देवरी,दि.16- राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागीय कार्यालयात निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या अधिकाऱ्यांची पाठराखण करून त्यांच्या बचावासाठी महामंडळाच्या हिताच्या तक्रारी जाणून गहाळ करून शासनाचा महसूल बुडविण्याचा सपाटा बिनभोबाट सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

सविस्तर असे की, भंडारा विभागातील गोंदिया आगाराची सर्वांत जास्त उत्पन्न देणारी गोंदिया लांजी व्हाया रजेगाव फेरी गोंदियाचे तत्कालीन आगार व्यवस्थापक व  भंडाराचे तत्कालीन विभाग नियंत्रक यांनी संगनमत करून बंद केल्याबाबतची  तक्रार देवरी येथील सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रा.प. मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांचकडे दि. 8 जानेवारी 2018 रोजी केली होती. या पत्राची प्रत भंडारा विभागीय कार्यालयातील आस्थापना शाखेच्या आवक विभागात दि 8 जानेवारी 2018 रोजी नरेश जैन यांनी दिली. 
नरेश जैन यांच्या द्वारे दि.15 एप्रिल 2019 रोजी माहितीच्या अधिकारात जनमाहिती अधिकारी तथा विभागीय वाहतूक अधिकारी भंडारा यांना अर्ज करून सदर प्रकरणी विभाग नियंत्रक भंडारा यांचेद्वारे महाव्यवस्थापक (वाहतूक) मुंबई यांना पाठविलेल्या अहवालाच्या प्रतची मागणी केली असता विभागीय माहिती निरंक आहे या प्रकारची माहिती नियमाप्रमाणे 30 दिवसात न पुरविता प्रथम अपिलिय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केल्यानंतर विलंबाने जैन यांना पुरविली.
दि.6 जून 2019 रोजी झालेल्या प्रथम अपील सुनावणी दरम्यान च ना वडस्कर माहिती अधिकारी तथा विभागीय वाहतूक अधिकारी भंडारा यांनी अपिलिय अधिकारी तथा विभाग नियंत्रक (प्रभारी) ग.ज. नागुलवार यांचे समक्ष सदर प्रकरणाची कोणतीच माहिती कार्यालयात उपलब्ध नाही, जैन यांची कोणतीच तक्रार कार्यालयात आलेली नाही, तसेच मध्यवर्ती कार्यालयात पत्र सुद्धा विभागीय कार्यालयात आलेला नाही,अशी कबुली दिली. त्यांच्या या कबूलीवर जैन यांनी आक्षेप घेतला व सर्व पुरावे अपिलीय अधिकारी यांच्या समक्ष सादर केले. जैन यांच्या विनंतीवरून आस्थापना शाखेतील आवक रजिस्टरची तपासणी करण्यात आली असता जैन यांच्या दोनही तक्रारींची नोंद आढळून आली. तसेच या दोन्ही तक्रारी विभागीय नियंत्रकांचे स्विस सहायक यांनी स्वीकारल्याची नोंद आढळून आली आणि तशी कबुली सुद्धा स्विस सहायकाने दिली. 
तत्कालीन विभाग नियंत्रक हे 30 सप्टेंबर 2019 रोजी राप सेवेतून निवृत्त होत असल्याने त्यांना शिक्षेपासून वाचविण्याकरिता जैन यांच्या तक्रारीला व मध्यवर्ती कार्यालयाच्या पत्राला भंडारा विभागीय कार्यालयातून गहाळ करण्यात आल्याचा आरोप नरेश जैन यांनी केला आहे.या प्रकरणी तक्रार दि 8 जून 2019 रोजी विभाग नियंत्रक भंडारा व महाव्यवस्थापक (वाहतूक)मुंबई यांचेकडे करून सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यावर माहिती दडविल्याचा कारणावरून योग्य की कार्यवाही करावी, अशी मागणी नरेश जैन यांनी केली आहे.