सातवी आर्थिक गणना विषयक एकदिवशीय प्रशिक्षण संपन्न

0
17

वाशिम, दि. १७ : केंद्र शासनाच्या सांख्यिकी विभागामार्फत राष्ट्रव्यापी सातव्या आर्थिक गणनेचे काम हाती घेण्यात आले असून, या गणनेद्वारे देशामध्ये कार्यरत सर्व प्रकारच्या आर्थिक कार्यात गुंतलेल्या आस्थापनांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. याअनुषंगाने आज  नियोजन भवन सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा सांख्यिकी अधिकारी ज. भा. अढाव, एनएसएसओ अकोलाचे वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी एस. एन. मुळे, आर. पी. लिखार, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी दिव्या शर्मा, कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा समन्वयक भगवंत कुलकर्णी, संजय यादव, श्रीकांत बोरसे, जिल्हा उद्योग केंद्रांचा श्री. ठाकरे उपस्थित होते.श्री. हिंगे म्हणाले, सातवी आर्थिक गणनेचे काम विहित कालावधीत व अचूकपणे पूर्ण होणे आवश्यक आहे. याकरिता सर्व संबंधितांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वकपणे पार पाडावी.या कार्यशाळेत श्री. मुळे यांनी सातवी आर्थिक गणना विषयी संकल्पना, व्याप्ती, उद्दीष्टे, क्षेत्रिय कामाकाजाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

ग्रामीण व शहरी भागात आर्थिक गणना ही सीएससी ई- गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत होणार आहे. कॉमन सर्व्हिस सेंटरचे केंद्र चालक हे आर्थिक गणनेच्या कामाचे पर्यवेक्षक असून ही गणना मोबाईल ॲपव्दारे करण्यात येणार आहे. गणनेमध्ये भारत सरकाचे सांख्यिकी मंत्रालय, केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय अंगीकृत सीएससी ई गव्हर्नन्स सर्विसेस लि. व राज्य शासन यांचा सहभाग असणार असून प्रथमत:च सदर गणनेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करून ही गणना तीन महिन्याच्या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे.

कॉमन सर्विस सेंटरचे प्रत्येक गावातील गाव पातळीवरील प्रतिनिधी (व्हीएलई) यांचेअंतर्गत नियुक्त प्रगणकांमार्फत मोबाईल ॲपद्वारे माहिती गोळा करणे, केंद्र शासनाच्या सांख्यिकी विभागामार्फत तसेच राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत त्याचे ॲपद्वारेच पर्यवेक्षण करणे ही यावेळची विशेष वैशिष्ट्ये आहेत.  या कार्यशाळेस कॉमन सर्व्हिस सेंटरचे केंद्र चालक, सांख्यिकी विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.