आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके आणि राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी घेतला विभागाचा आढावा

0
11

मुंबई, दि. 19 : आदिवासी विकास विभागाचे नवनियुक्त मंत्री डॉ. अशोक उईके व राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी आदिवासी विकास विभागाची मंत्रालयात आढावा बैठक घेतली.अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता लोकाभिमुख कार्य वाढविण्याच्या दृष्टीने मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजनांची माहिती विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये दर्शनी भागात लावण्यात यावी. आदिवासी जमातीच्या लोकांना योजनेचा लाभ घेता यावा, याकरिता व्यापक प्रसिद्धी देण्यासह विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणी विषयक हेल्पलाईन व डॅशबोर्डची निर्मिती करण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. विभागाच्या सर्व योजना अंमलबजावणीविषयक वेळापत्रक सादर करण्याविषयीदेखील सांगितले.यावेळी आमदार संजय पुराम हे सुध्दा उपस्थित होते.

विभागाच्या एकंदरीत अर्थसंकल्पीय, शैक्षणिक, आरोग्य, उपजीविकेबाबतच्या योजनांविषयी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. शैक्षणिक योजनांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी लक्ष देण्याबाबत राज्यमंत्री डॉ. फुके यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच आरोग्य विषयक समस्या सोडविण्याकरिता विभागाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.मंत्री डॉ. उईके यांनी पेसा अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच आश्रमशाळा मुख्याध्यापक यांची राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्याविषयी सूचना देऊन आदिवासींच्या उन्नतीकरिता वैयक्तिक लाभाच्या योजना, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, परदेशी शिष्यवृत्ती तसेच कौशल्य विकास कार्यक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. यापुढे प्रत्येक आठवड्यात बैठक घेण्यात येऊन अगोदरच्या बैठकीतील दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही केली किंवा नाही याची माहिती घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.