मुख्य बातम्या:

शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय मुलांचे भविष्य घडणार नाही- गुणवंत पंधरे

गोंदिया दि.२०: शिक्षणापासून वंचित असलेले, गरीबीत खितपत पडलेल्या अनेकांची मुले आजही भंगार गोळा करतात. लोकांच्या घरी झाडू पोछा करतात. गटारातून कबाडी गोळा करतात. रेल्वेस्टेशन परिसर, बसस्थानक किंवा सार्वजनिक कचराकुंडीतून फेकलेल्या टाकावू वस्तुमधील आयुष्याचा शोध ते घेत असतात. आलेल्या पैशातून ते दोन घासाची सोय करीत असतात. तर दुसरीकडे हक्काचे शिक्षण कायदा व बालमजुरी विरोधी प्रथेसंबंधात केलेला कायदा त्यांच्यासाठी कितपत उपयोगी ठरत आहे. याबाबतीत शासन स्तरावर प्रयत्न करुन अशा मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याशिवाय त्या मुलांचे भविष्य घडणार नाही. असे विचार सरकारी कामगार अधिकारी गुणवंत पंधरे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिनानिमीत्त विशेष प्रशिक्षण केंद्र, यादव चौक, गोंदिया येथे आयोजित बालकामगार जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समितीच्या सदस्या डॉ.निशा भुरे होत्या. यावेळी बालसंरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, नगरसेवक पंकज यादव, लोकेश यादव, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समितीचे प्रकल्प संचालक महेंद्र रंगारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.पंधरे पुढे म्हणाले, बालकामगारांना मुलभूत शिक्षण देणे गरजेचे असून बालमजुरी अनिष्ठ प्रथा ही संकल्पना नष्ट व्हावी यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
डॉ.निशा भुरे यांनी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समितीची जिल्ह्यातील स्थापनेबाबतची सविस्तर माहिती दिली. गजानन गोबाडे यांनी मुलांच्या संरक्षणासंदर्भात उपस्थितांना विस्तृत माहिती दिली.
प्रास्ताविकेतून महेंद्र रंगारी यांनी सांगितले की, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समितीमार्फत आजपर्यंत २०६२ बालमजुर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले असून बालकामगार मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष्य देण्यात येत आहे.
यावेळी पंकज यादव यांनी विशेष प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष्य देण्याचे सांगितले. लोकेश यादव यांनी इमारत व बांधकाम मंडळामार्फत यादव चौक परिसरातील मजुरांचे बरेचसे अर्ज सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आले असून या बांधकाम मजुरांना मंडळामार्फत लवकरात लवकर लाभ देण्याकरीता सहकार्य करण्यात यावे असे त्यांनी सांगितले.
भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या अंतर्गत राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समितीचे काम जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सुरु असून १२ जून जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समिती व सहायक कामगार आयुक्त यांच्या संयुक्त वतीने जिल्ह्यात बालमजुरी निषेध प्रथा म्हणून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शरयु डहाट यांनी केले. उपस्थितांचे आभार नितीन डबरे यांनी मानले. कार्यक्रमास गौतमनगर, संजयनगर, मुर्री, छोटा गोंदिया, गड्डाटोली, सुंदरनगर व यादव चौक येथील विशेष प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेणारे बालमजुर विद्यार्थी, पालकगण, परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील १६ विशेष प्रशिक्षण केंद्रातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Share