वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांना सहकार्य करु नये- वनविभागाचे आवाहन

0
14

वाशिम, दि.20: वाशिम वनविभागामध्ये वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगांव वन परिक्षेत्राअंतर्गत 41 हजार 971.66 हेक्टर वनक्षेत्र आहे. यामध्ये महसूल विभागाकडून वन विभागाच्या ताब्यात ई-वर्ग जमीन मिळाली आहे. त्याबाबत शासनाकडून राखीव वन घोषीत करण्याची अधिसूचना जाहिर झाल्या आहेत. वन घोषीत झालेली ई-वर्ग असलेली 4794.14 हेक्टर जमीन वन विभागाच्या ताब्यात आहे. या जमीनीवर काही वर्षापासून संबंधित गावातील किंवा आजूबाजूच्या लगतच्या गावातील नागरिकांनी अतिक्रमण करुन वनाचे व पर्यावरणाचे नुकसान केले आहे. वन्यजीवांचा अधिवास नष्ट करुन अवैध वृक्षतोड करुन काही इसमांनी अवैधरीत्या शेती पिकाकरीता अतिक्रमण केले आहे.

      संबंधित ग्रामस्थांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या गावातील अतिक्रमणधारकांना बैलजोडी, ट्रॅक्टर नांगरणी यंत्र, पेरणी यंत्र किंवा तत्सम साधनांचे सहकार्य करु नये अन्यथा अतिक्रमणधारकांसह त्यांना सहकार्य करणाऱ्या इसमांविरुध्दसुध्दा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वनक्षेत्र अबाधित राहणे आवश्यक आहे. स्वत:पुरता वैयक्तीक फायदा घेण्यासाठी अतिक्रमण होत आहे. अतिक्रमणधारकांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरीत्या मदत केल्या जाते. त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीमुळे भविष्यात अनेक आपत्तींना निमंत्रण मिळते. पर्यावरण वाचविण्यासाठी पर्यायाने स्वत:ला वाचविणे गरजेचे आहे. त्यामुळे वन विभागाच्या मालकीच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करणाऱ्यांना गावकऱ्यांनी सहकार्य करु नये. असे आवाहन वन विभागाने केले आहे.