दिव्यांग बांधवांना सहायक उपकरणांचे वितरण

0
14

वाशिम, दि. 20 : जिल्हा प्रशासनाच्या वतीने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या सामाजिक दायित्वातून जिल्हयातील दिव्यांग बांधवाना 19 जून रोजी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात सहायक उपकरणांचे वितरण करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा हर्षदा देशमुख, जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे उप महाप्रबंधक एच.जे. सकलेचा, जिल्हा परिषद सदस्य गजानन अहमदाबादकर, उस्मान गारवे, अनिल कांबळे, रत्नप्रभा घुगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

      जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती देशमुख म्हणाल्या, जिल्हा परिषदेमार्फत जिल्हयातील दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येतो. जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक असलेली उपकरणे पुरविण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगीतले. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने वाशिम जिल्हयाची दिव्यांग बांधवांना सहायक उपकरणांचे वितरण करण्यासाठी निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, जिल्हयातून दिव्यांग बांधवांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत. यावेळी अन्य मान्यवरांची समायोचित भाषणे झाली. पालकमंत्री यांचा शुभेच्छा संदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी वाचून दाखविला.इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने आपल्या सामाजिक दायित्वातून जिल्हयातील दिव्यांग बांधवांसाठी तीन चाकी सायकल, व्हिल चेअर, कृत्रिम अंग, डिजिटल श्रवणयंत्र, मतिमंद लाभार्थ्यांना डिजिटल मशीन, अंधाकरीता सेन्सर स्टीक व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हयातील 540 निवड झालेले दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते. जिल्हयातील उर्वरीत सर्व दिव्यांग बांधवांची वैद्यकिय तपासणीव्दारे निवड करुन त्यांना सुध्दा अशाप्रकारचे साहित्य पुरविण्याचे आश्वासन देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी मानले. कार्यक्रमाला नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.