पदवीधर मतदार संघाचे आमदार सोले बनले वृक्षदिंडीकार

0
39

खेमेंद्र कटरे/गोंदिया,दि.२६ः – संघाचे शिस्तप्रिय स्वयंसेवक आणि भाजपचे विचारवंत म्हणून मिरवणारे प्रा. अनिल सोले हे नागपूर पदवीधर मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून विधानपरिषदेत पोचले असले तरी त्यांना आपल्या कर्तव्याचा पार विसर पडलेला दिसत आहे. पदवीधरांचे आमदार म्हणून सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांना सभागृहात वाचा फोडून त्यांना न्याय देण्याऐवजी त्यांनी सध्या स्वहितकारी दिंडीकार होण्यातच धन्यता मानली आहे.परिणामी, स्वपक्षातील युवा कार्यकत्र्यांसह बेरोजगार युवकांवरही प्रा. सोले यांच्या निवडीमुळे पश्चात्ताप करण्याची पाळी आल्याचे चित्र आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून विधानपरिषदेत भारतीय जनता पक्षाकडून प्रा.अनिल सोले निवडून गेले. पदवीधर मतदारसंघातून निवडून गेल्याने ते पदवीधरांचे अनेक प्रश्न मार्गी लावतील,त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधीवर सरकारला काहीतरी विचारतील आणि पदवीधर बेरोजगार युवकांना न्याय देतील असा एक विश्वास होता. मात्र, पदवीधरांमधून निवडून गेलेले आमदार हे  केवळ वृक्षदिंडी आमदार ठरले. गेल्या चार वर्षापासून स्वतःच्या ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन संस्थेच्या उद्धारासाठी त्यांनी निवडून आल्यापासून विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वृक्षदिंडी काढायची आणि नागपूर जिल्ह्यात तिचा समारोप करायचा. या एकमेव कार्यक्रमाव्यतिरिक्त त्यांना गोंदिया किंवा भंडारा जिल्ह्यात इतर प्रश्नांवर,पदवीधर बेरोजगार युवकांच्या प्रश्नावर कुठे बैठक घेताना बघितल्याचे कुणालाही आठवत नाही. असे आमच्या वृक्षदिंडी आमदारांचे आज(दि.२६ जून) गोंदिया जिल्ह्यात आगमन होत आहे.काही निवडणुकांमधील प्रचार सोडला तर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाèया नियोजन समितीच्या बैठका असो की इतर बैठकांना कधी हजेरी लावली असेल असे कुठे बघण्यात आले नाही. त्यामुळे बेरोजगार पदवीधर युवकांनी आता त्यांना पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणण्याऐवजी वृक्षदिंडी आमदारच म्हणायला सुरवात केली आहे. काही पदवीधर युवकांनी प्रा. सोलेंकडे काही प्रश्न घेऊन गेले तर त्यांचे प्रश्न ऐकण्याच्या मनःस्थितीतच नसतात अशी खंत सुद्धा व्यक्त केली.
पदवीधरांच्या प्रश्नासाठी नव्हे तर ते पक्षाच्या प्रचारासाठी व वृक्षदिंडीच्या माध्यमातून शासकीय तिजोरीतील निधी आणि सहभाग आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी करून घेण्याची त्यांना आवड आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. वृक्षदिंडीच्या माध्यमातून ते एकमेव जनजागृतीचाही कार्यक्रम राबवीत आहेत, याबद्दल त्यांचे अभिनंदन करायलाच हवे. परंतु, वर्षभर कुठल्याही जिल्ह्यात आपण भटकत नाही. मात्र, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक आठवड्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करून आपण सर्वच जिल्ह्यात वृक्षदिंडीच्या माध्यमातून वनसंरक्षणासाठी फिरता.पण कधीतरी पदवीधर बेरोजगारांच्या समस्येवर उपाय सरकारने शोधावा यासाठी एकतरी दिंडी का बरं काढली नाही. पदवीधरांना न्याय देणारी दिंडी हा सुद्धा प्रश्न सोले साहेब आपणास विचारला जाऊ लागला आहे.कधीपर्यंत स्वतःच्याच संस्थेच्या प्रचारासाठी आमदारकीचा उपयोग करणार? आम्हा पदवीधर बेरोजगारांना कधी न्याय देणार,आमच्या नोकरीसाठी रोजगारासाठी कधी दिंडी काढणार हे तरी आम्हाला सांगा, अशी आर्त हाक बेरोजगार युवकांनी प्रा. सोले यांना लावली आहे.
राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील १ ते ३१ जुलै २०१९ दरम्यान राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्याची घोषणा केली आहे. त्याच अनुषंगाने आ. प्रा. अनिल सोले यांच्या संकल्पनेतून मागील चार वर्षांपासून वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात येते. दोन ते तीन हजार किलोमीटरचा प्रवास करीत गावोगाव वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा संदेश वृक्षदिंडींच्या माध्यमातून दिला जात आहे. यंदाही आ. सोले यांच्या ङ्कग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनङ्क च्या माध्यमातून नागपूर विभागात म्हणजेच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये वृक्षदिंडीचे आयोजन २३ जूनपासून वर्धा जिल्ह्यातील आंजी येथून करण्यात आले आहे,तिचा समारोप २९ जून रोजी नागपूर येथील सक्करदरा चौक मार्गे उमरेड येथे होणार आहे.