प्रशासन नमले शिवलालला दिला पूर्वीचा भूखंड

0
23

मोहाडी,दि.30ः-तालुक्यातील सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांचे घरपाडून त्यांच्यावर केलेल्या अन्यायाबद्दलच्या आंदोलनाला सत्ताधारी पक्षवगळता सर्वांनीच पाठिंबा देत त्यांच्या पाठिशी खंबीरपणे राहिल्याने महसूल प्रशासनाला अखेर जुनाच भूखंड ताब्यात देण्याचा निर्णय घ्यावा लागला.त्यानंतर एक महिन्यापासून सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांना उपोषणकर्त्या मुलांना थंड पेय पाजून उपोषण सोडविले.
शनिवारला सकाळपासून सिरसोली येथील प्रकरणात काय होते, याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या. तहसील कार्यालयात सकाळनंतर पोलिसांचा तगडा ताफा लागलेला होता. त्यामुळे प्रशासन कोणाची बाजू घेते याबाबत शंका व्यक्त केल्या जात होत्या. तुमसरचे उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे, त्यानंतर तहसीलदार धनंजय देशमुख तहसील परिसरात येताच सगळ्यांच्या नजरा तिकडे फिरल्या. काही वेळाने शेतकरी नेते माधवराव बांते, राष्ट्रवादीचे नेते नरेश डहारे, वंचित बहुजन आघाडीचे नेते विजय शहारे, अन्यायग्रस्त शिवलाल लिल्हारे, सलीम पठाण यांचे प्रतिनिधी मंडळ उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी तब्बल एक तास चर्चा केली.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू उपस्थित होत्या. प्रतिनिधी मंडळाचे समाधान झाल्याने शिवलाल लिल्हारे यांना उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांनी आबादी भूखंड प्रमाणपत्र दिला. यानंतर प्रतिनिधी मंडळ व महसूल विभाग, पोलिस विभागाचे अधिकारी उपोषण मंडपात दाखल झाले. यावेळी उपोषणावर बसलेले शिवलाल लिल्हारे यांच्या सतीश व समीर या दोन मुलांना उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू यांचे हस्ते थंड पेय पाजून उपोषण सोडविण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते राजू कारेमोरे, किसान नेते माधवराव बांते, काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. उपोषणाला पाठींबा देणार्‍या गावकर्‍यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी राकाँचे किरण अतकरी, सरपंच नरेश ईश्‍वरकर, विजय शहारे, डॉ. सलिम पठाण, लोधी संघटनेचे राधेश्याम नागपूरे, पांडूरंग मुटकुरे यांच्यासह देविलाल लिल्हारे, गजानन बशिने, कलीम छव्वारे, सलीम छव्वारे, शमी कुरेशी, श्रीधर बंधाटे आदी गावातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.