ई-महापरीक्षामार्फत २ जुलैपासून तलाठी पदासाठी परीक्षा

0
8

वाशिम, दि. ३० : राज्य महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या २ जुलै ते २६ जुलै २०१९ या कालावधीत ई-महापरीक्षा मार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यातील १२२ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसंदर्भात अधिक माहिती अथवा तक्रारींसाठी १८०० ३००० ७७६६ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

राज्य शासनाने सर्व विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार महसूल विभागातील तलाठी संवर्गातील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. या पदासाठी २ जुलैपासून राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे पूर्ण संचलन व कार्यान्वयन महा-आयटी (माहिती तंत्रज्ञान) विभागाच्या माध्यमातून ई-महापरीक्षा मार्फत होणार आहे. उमेदवारांच्या पसंतीच्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी संगणक विषय पायाभूत सोयी असणाऱ्या शाळा / कॉलेजची निवड महा-आयटीकडून करण्यात येऊन राज्यभरात एकूण-१२२ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेसंदर्भात महाआयटीकडून परीक्षार्थींना सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर उमेदवाराने खालील सहापैकी एक मूळ फोटो ओळखपत्र  आणणे अत्यावश्यक आहे. यामध्ये पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स), मतदान ओळखपत्र, मूळ फोटोसह राष्ट्रीयकृत बँक पासबुक, आधार कार्ड यांचा समावेश आहे. ओळखपत्र फेरफार करुन तोतया उमेदवार येऊ नये यासाठी फोटो ओळखपत्राची रंगीत झेरॉक्सई-आधार कार्ड आणि फोटो ओळखपत्राची सॉफ्ट कॉपी वैध ओळखपत्र पुरावा म्हणून स्विकारली जाणार नाहीअशा स्पष्ट सूचना उमेदवारांच्या हॉल तिकिटावर देण्यात आल्या आहेत.

महापरीक्षा पोर्टलवरून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा सुरू असतांना नियमांचे पालन केले जात आहे नाकाही गैरप्रकार होत नाही नायावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा निरीक्षक (ऑब्झर्व्हरम्हणून एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहेअसे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

महापरीक्षा पोर्टलवरील तसेच परीक्षा प्रवेश पत्रावरील सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन करावे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी/तक्रारी नोंदविण्यासाठी महापरीक्षा १८०० ३००० ७७६६ हा टोल फ्री तसेच [email protected] या ईमेलवर संपर्क साधावाअसे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

वाशिम, दि. ३० : जिल्हा सेतू समिती अंतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाकरिता कंत्राटी पद्धतीने डाटा एन्ट्री ऑपरेटर (सीडीईओ) या पदासाठी अर्ज ११ जुलै २०१९ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक आर्हता १२ वी पास, मराठी व इंग्रजी टंकलेखन अनुक्रमे ३० व ४० शब्द प्रती मिनिट तसेच एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उच्च शैक्षणिक अर्हता व उमेदवाराने डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम केले असल्यास प्राधान्य राहील. मात्र त्याकरिता अर्जदाराने संबंधित कार्यालयाचे तसे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारास प्रतिमाह ७ हजार रुपये मानधन देण्यात येईल.

इच्छुक पात्र उमेदवारांनी २ ते ११ जुलै २०१९ या कालावधीत कार्यालयीन दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वा. दरम्यान कागदपत्रांसह उपस्थित राहून जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सेतू समितीमार्फत उपलब्ध अर्जाच्या विहित नमुन्यामध्ये माहिती भरून स्वतःचे पासपोर्टसह व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ११ जुलै २०१९ प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

कंत्राटी तांत्रिक अधिकारी पदासाठी अर्ज मागविले

वाशिम, दि. ३० : जिल्हा सेतू समिती अंतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाकरिता तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयातील एकूण १० जागांवर कंत्राटी पद्धतीने तांत्रिक अधिकारी (टीओ) या पदासाठी अर्ज ११ जुलै २०१९ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

तांत्रिक अधिकारी पदासाठी निवृत्त स्थापत्य अभियंते यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच निवृत्त स्थापत्य उपलब्ध नसतील तर अन्य स्थापत्य पदवी अभियंता पदवी, पदविकाधारक यांची निवड करण्यात येईल. या पदावर निवड झालेल्या प्रतिमाह १४ हजार रुपये मानधन देण्यात येईल.

इच्छुक पात्र उमेदवारांनी २ ते ११ जुलै २०१९ या कालावधीत कार्यालयीन दिवशी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वा. दरम्यान कागदपत्रांसह उपस्थित राहून जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा सेतू समितीमार्फत उपलब्ध अर्जाच्या विहित नमुन्यामध्ये माहिती भरून स्वतःचे पासपोर्टसह व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ११ जुलै २०१९ प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

वाशिम, दि. ३० : सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अंतर्गत २०१९-२० या वर्षात वाशिम व कारंजा या महसूल उपविभागातील प्रत्येकी एका गोशाळेची अनुदानाकरिता निवड करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. इच्छुक संस्थांनी आपाले परिपूर्ण प्रस्ताव १० १० जुलै २०१९ पर्यंत सबंधित पंचायत समितीमार्फत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी केले आहे.

सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना अंतर्गत निवड झालेल्या गोशाळांमध्ये अनुत्पादक गाई, वळू-बैल, तसेच वयस्क झालेले गोवंशाचा सांभाळ करण्यात येईल. अशा पशुधनासाठी चारा-पाणी व निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणे, तसेच आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे व गोमुत्र, शेण इ. पासून विविध उत्पादने निर्मितीस चालना देण्यात येणार आहे. याकरिता शासनाकडून २५ लक्ष रुपये इतके अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी कळविले आहे.