जीवनात सांख्यिकीचे महत्व अनन्यसाधारण- डॉ.कादंबरी बलकवडे

0
26

गोंदिया,दि.30 : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एखादया आकडवारीचे नियोजन चुकीच्या पध्दतीने झाले तर सगळे काही चुकत असते. त्यासाठी सांख्यिकीचा आधार महत्वाचा असतो. शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सांख्यिकीची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे जीवनात सांख्यिकीचे महत्व अनन्यसाधारण आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलवकडे यांनी केले.
नियोजन विभाग, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा सांख्यिकी कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात २९ जून रोजी सांख्यिकी दिन कार्यक्रमाचे उदघाटन करतांना डॉ.बलकवडे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती मृणालीनी भूत हया होत्या. यावेळी प्रभारी अपर जिल्हाधिकारी सुनिल कोरडे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, जिल्हा सांख्यिकी अधिकारी नवनाथ चव्हाण, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संदिप भिमटे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) श्रीमती पुजा पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.बलकवडे पुढे म्हणाल्या, मानवाचा सर्वांगीण विकास करतांना पर्यावरणाचा समतोल राखला पाहिजे. यासाठी शाश्वत शेतीला चालना, सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानता, सर्वांना स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देणे व गरीबीचे निर्मूलन करणे आदी बाबींचा सांख्यिकीकरणामध्ये अंतर्भाव आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्रीमती भूत म्हणाल्या, सांख्यिकीचा पाया सर्वप्रथम प्रा.प्रशांतचंद्र महालनोबीस यांनी रचला. सांख्यिकी हा नियोजनाचा पाया आहे. सांख्यिकीचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात होत असतो. शासनाच्या विकासात्मक विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये सांख्यिकीचे महत्व अनन्यसाधारण आहे. यावेळी त्यांनी नीती आयोगाच्या सांख्यिकीकरणाची सविस्तर माहिती विशद करुन सांख्यिकीकरणाला किती महत्व आहे असे सांगितले.
प्रास्ताविकातून जिल्हा सांख्यिकी अधिकारी नवनाथ चव्हाण म्हणाले, जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सर्वकष माहितीकोष, पीक कापणी प्रयोग व नॅशनल सॅम्पल सर्व्हे पाहणी यांचा सांख्यिकी कार्यालयाद्वारे सविस्तर डाटा तयार करण्यात येतो. सांख्यिकी दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात शाश्वत विकासाची ध्येय याबाबत त्यांनी सविस्तर माहिती देवून आपल्या दैनंदिन जीवनात सांख्यिकीकरणाचे किती महत्व आहे असे सांगितले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक व सहायक जिल्हा नियोजन अधिकारी संदीप भिमटे यांनी मानवाच्या दैनंदिन जीवनात सांख्यिकीचे किती महत्वाचे स्थान आहे याबद्दल विस्तृत माहिती दिली. सहायक जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) श्रीमती पुजा पाटील यांनी ‘शाश्वत विकासाची ध्येयङ्क याबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन सांख्यिकी सहायक तुलसीदास झंझाड यांनी केले, उपस्थितांचे अभार संदीप भायदे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुनील फुके, निकलेश दडमल, आरीफ शेख, मनीष रेगे, देवेंद्र करंजेकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.