परिवर्तनवादी चळवळीने ऐक्याची भूमिका घ्यावी-डाॅ.आ.ह.साळुंखे

0
18

सांगली(दिलीप वाघमारे)दि.01 जुर्ले : प्रवाहाच्या विरोधात जाऊन काही करणाऱ्यांना आजच्या घडीला प्रतिकूल परिस्थितीचा अनुभव येत आहे. महिन्याभरापासून तर संभ्रमावस्था वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीत न हारता, निराश न होता दुप्पट जोमाने विचारांची बांधणी व्हावी, मूल्यांच्या रुजवणुकीबरोबरच परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी नाउमेद न होता विवेकनिष्ठा जपत ऐक्याने काम करावे, असे आवाहन बहुजन सत्यशोधक विचारधारेचे ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी रविवारी सांगलीत केले.सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात आयोजित सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. गणेश देवी, डॉ. बसवलिंग पट्टदेवरू ,डॉ. भारत पाटणकर, हौसाबाई पाटील, शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचे गौतम पाटील व मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला हजारो वर्षांची मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरी बहुजनांनी झुगारून द्यावी याकरिता चार्वाक बुद्धापासून ते फुले-शाहू-आंबेडकरांच्या पर्यंत महापुरुषांच्या कार्याचा चिकित्सक पणे अभ्यास करुन,इतिहासाची पुनर्मांडणी करणे करिता प्रबोधन व लेखनातून जीवाचे रान करणारे, इतिहास संशोधक, संस्कृतचे प्रकांडपंडित आणि परिवर्तनवादी चळवळीचा आधार,डॉ. आ.ह. साळुंखे तात्या यांच्या पंच्याहत्तरीचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.विश्रामबाग येथील प्रतिसरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून विचार प्रबोधन रॅली व चित्ररथाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या होसाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.संपूर्ण सांगली शहरातून वाजत गाजत डॉक्टर आ. ह .साळुंखे तात्या यांनी लिहिलेल्या 60 हुन अधिक पुस्तकांच्या विचारांचे जागर करणारे चित्ररथ पाहण्यासाठी अक्षरशःशेकडो लोकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी प्रचंड गर्दी केली होती.या रँलीत मराठा सेवा संघाचा बळीराजाचा जीवंत देखावा आणि आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचा चित्ररथ विशेष आकर्षण ठरले.

डॉ. साळुंखे म्हणाले, समाजातील परिस्थिती प्रतिकूल बनत चालली आहे. यातून आपण हारलो आहोत का? असा काळजीचा सूर सर्वत्र दिसून येत आहे. मात्र, नैराश्येचा सूर न काढता दुप्पट जोमाने विवेकनिष्ठा जपत काम केल्यास, आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करणे शक्य आहे. शोषकांकडून होणाºया अन्यायावर केवळ निषेध करत थांबून चालणार आहे का? त्यासाठी आपल्याला शोषण करणाऱ्यांपेक्षा ताकदवान बनावे लागणार आहे. किरकोळ मतभेद असणाºया, परंतु एकाच उद्दिष्ट, ध्येयाकडे जाणाºया कार्यकर्त्यांना वेगळी वागणूक न देता मतभेदासह चर्चा करत व्यवस्था बदलण्यासाठी त्यांच्यात ऐक्य निर्माण करायला पाहिजे. जे सैन्य आपापसात भांडत राहते, ते शत्रूचा पराभव करू शकत नाही, हे विसरता कामा नये.देशामध्ये अविश्वास, तिरस्काराचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी सर्वांनी एक झाल्याशिवाय बलवान होऊन शोषण करणाºया प्रवृत्तीविरोधात आवाज उठविता येणार नाही. काळ वेगाने बदलत असल्याने आपणही धैर्याने उभे राहत संघर्षाची भूमिका घ्यायला हवी. मनाने गुलाम न होता, दडपणे कितीही असूदेत, त्यातून बाहेर आले की संघर्ष करता येतो.
यावेळी साळुंखे यांना मराठी व मोडी लिपीतील मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मानपत्राचे वाचन डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गौतम काटकर यांनी केले, तर प्रस्तावना धनाजी गुरव यांनी केली. सत्कार समितीचे अध्यक्ष व्ही. वाय. (आबा) पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. आ. ह. साळुंखे भावूक झाले होते. ते म्हणाले, भावनात्मक कल्लोळ उठविणारा हा सत्कार आहे. सत्कार हा निमित्तमात्र असला तरी, विचारमंथन घडावे हा त्यामागील हेतू आहे. कुटुंबीयांच्या निधनानंतर आलेली पोरकेपणाची जाणीव चाहत्यांनी, वाचकांनी, विद्यार्थ्यांनी बळ दिल्याने नाहीशी झाली आहे. जन्म सांगलीच्या मातीत झाला. मातीचा गंध आणि निसर्गाच्या स्पर्शाचे अस्तित्व आजही विसरू शकत नाही. सांगलीकरांनी केलेला हा सत्कार म्हणजे आईच्या कुशीत असल्याचा आनंद होत आहे. सांगलीकरांच्या सत्कारात आईच्या वात्सल्याची जाणीव होत आहे.
वैशिष्ट्यपूर्ण सत्काराचे स्वरूप
डॉ. आ. ह. साळुंखे अमृतमहोत्सवी सत्कार समितीच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांच्याहस्ते करण्यात आला. मराठी व मोडी लिपीतील मानपत्र, फुले पगडी, काठी आणि घोंगडे, सांगलीची जगप्रसिध्द हळद, गुळाची ढेप, बेदाणा, सतार देऊन हा सत्कार करण्यात आला. सत्कार समितीने गेल्या महिन्याभरापासून केलेल्या प्रयत्नामुळे, कार्यक्रमाच्या नेटक्या संयोजनाचे उपस्थितांनी कौतुक केले.