गडचिरोली जिल्हयातील १३०० युवक, युवतींना मिळाला रोजगार

0
15

गडचिरोली-अतिदुर्गम, मागास, आदिवासी आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या कौशल्य विकास कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त झाले आहे. त्याचीच फलश्रुती म्हणून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे 1300 तरुण-तरुणींना राज्याच्या विविध भागात नोकरीची सुवर्ण संधी मिळाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात राहणा-या नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, तसेच त्यांचा सर्वांगिण विकास घडवून आणण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. गावाच्या विकासापासून ते विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यापर्यंतची मदत शासनातर्फे केली जात आहे. नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील तरुण – तरुणींना स्वयंभू करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रमांच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील एकमेव कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
या कौशल्य विकास कार्यक्रमाची सुरूवात 2012 पासून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी विविध अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्यात हॉटेल, बांधकाम, ऑटोमोबाईल, डाटा एन्ट्री ऑपरेटर, टॅली, बॅंकींग, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी क्षेत्रांचा समावेश आहे. हे कौशल्य विकास कार्यक्रम जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाच्या व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. या केंद्रात बेरोजगार युवक-युवतींची कौशल्य चाचणीच्या माध्यमातून प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येते. या प्रशिक्षणार्थींना अहमदनगर, लातुर, औरंगाबाद, कोल्हापूर, सागर (मध्यप्रदेश) या ठिकाणी असलेल्या नामांकित कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणासाठी जाणा-या युवक-युवतींचा निवास, जेवण व इतर सोयी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
याबाबतचे प्रशिक्षण राज्यातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये उपलब्ध करून दिले जात आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनाद्वारे या युवक-युवतींना प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देऊन मुंबई, पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद इत्यादी शहरातील नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून सहकार्य करण्यात येत आहे.
2012 या वर्षात 26 नोव्हेंबर 2012 ला पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आली. यात पहिल्या वर्षी 169 युवक-युवतींचा सहभाग होता. त्यातील 144 युवक-युवतींनी प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळविले. त्यापैकी 115 युवक-युवतींना राज्यातील विविध भागात प्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहे. त्यानंतर 31 मार्च 2015 पर्यंत प्रशिक्षणाचे एकूण 25 सत्र राबविण्यात आले असून 2 हजार 162 युवक युवतींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यातील 1 हजार 461 युवक-युवतींनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यापैकी 1 हजार 231 युवक-युवतींना प्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे यात नक्षलग्रस्त आणि दूर्गम भागातील युवक-युवतींचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी रणजितकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाचे सहायक संचालक प्रकाश देशमाने आणि रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी योगेंद्र शेंडे यांच्याद्वारे बेरोजगार युवक-युवतींना रोजगारासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील युवक-युवती कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला सर्वांगिण विकास करून रोजगार प्राप्त करीत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबांनासुध्दा मोठा आधार मिळाला आहे. एकप्रकारे गडचिरोलीसारख्या नक्षल जिल्ह्यातील ही एक मोठी उपलब्धी आहे.