मुख्य बातम्या:

नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या न सोडविल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा

नवेगावबांध,दि.13 : येथील ग्रामीण रुग्णालय आदिवासी नक्षलग्रस्त, दुर्गम भागात असल्याने या क्षेत्रातील आदिवासी, गरीब जनतेची आरोग्य सेवा याच ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहे. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाल्याने रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढत आहे.मात्र एक वैद्यकीय अधिकारी आणि एक अधिपरिचारिकेच्या भरोश्यावर रुग्णालयाचा कारभार सुरू आहे.येथील ग्रामीण रुग्णालय ३० खाटांचे असून या रुग्णालयात वर्ग एक ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसह २६ पदे मंजूर आहेत.मात्र यापैकी १६ पदे भरण्यात आली असली तरी प्रत्यक्षात १० अधिकारी कर्मचारी सध्या स्थितीत कार्यरत आहे. परिणामी उपचारासाठी येणाºया रुग्णांचे बेहाल होत असल्याने नवेगावबांधचे सरपंच अनिरुध्द शहारे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री व आदिवासी विकास,वन व बांधकाम राज्यमंत्री डाॅ.परिणय फुके तसेच माजी मंत्री राजकुमार बडोले यांना निवेदन पाठवून येथील समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.समस्या न सोडविल्यास 16 जुर्लेपासून आंदोलनाचा व कुलूप ठोकण्याचा इशारा सुध्दा दिला आहे.
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रूग्णांची कशी गैरसोय होत आहे. ही बाब जिल्हा आरोग्य अधिकाºयांच्या लक्षात अनेकदा आणून दिली. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिले आहे. ८ जुलैला बदली झालेल्या डॉ. संदीप खुपसे यांना रात्रीला तात्काळ कार्यमुक्त केले. देवरीच्या डॉ. गुल्हाने यांना या रुग्णालयाचा कार्यभार स्वत: उपस्थित राहून रात्रीच सोपविला. त्यांचा रुग्णालयाला कसलाही लाभ झाला नाही. हीच तत्परता प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हिंमतराव मेश्राम यांनी डॉ. खुपसे यांना कार्यमुक्त करुन दाखविले. तेवढीच तत्परता या रुग्णालयाला आवश्यक असलेले वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारीका, औषधी निर्माता व इतर पदांची रिक्तपदे भरण्यात आली असती तर रुग्णालयाची आरोग्यसेवा सुरळीत झाली असती, असेही निवेदनात म्हटले आहे. नवेगावबांध परिसरातील गरीब आदिवासी रुग्णांसह शासनमान्य पाच आदिवासी आश्रमशाळा तीन वसतीगृहे, केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील हजारो विद्यार्थ्यांची आरोग्य सेवा सुध्दा याच रुग्णालयावर अवलंबून आहे. बाह्यरुग्ण तपासणी विभागात दररोज ३०० ते ४०० रुग्ण तपासणी व उपचारासाठी या रुग्णालयात येतात.
येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी आणि वैद्यकीय अधिकाऱ्याची रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावी. डॉ.गुल्हाने यांच्याऐवजी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देऊन येथील आरोग्य सेवा सुरळीत करावी अशी मागणी सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी पालकमंत्री परिणय फुके यांच्याकडे लेखी निवेदनातून केली.
९ जुलैला जिल्हा शल्यचिकित्सकांनी नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे त्वरीत भरण्याचे आश्वासन सरपंच अनिरुध्द मेश्राम यांना दिले होते. मात्र दोन दिवस लोटूनही या आश्वासनाची पुर्तता केली नाही. वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका प्रतिनियुक्तीवर किंवा नियुक्तीवर अद्यापही रुजू झाले नाही. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांचे आश्वासन हवेत असल्याचे चित्र आहे.

Share