एकही बालक बाल हक्क संरक्षणापासून वंचित राहू नये- जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

0
11

गोंदिया,दि.14 : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांच्या वतीने १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांच्या विविध समस्या व तक्रारीबाबत जनसुनावणी होणार आहे. यामध्ये नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा या जिल्ह्याचा समावेश राहणार आहे. यासंदर्भात आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात यावे. जेणेकरुन जिल्ह्यातील एकही बालक बाल हक्क संरक्षणापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.
यासंदर्भात १२ जुलैला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील विविध विभागातील बाल हक्क संरक्षणाचे जनसुनावणीबाबत आढावा घेण्यात आला, त्यावेळी डॉ.बलकवडे बोलत होत्या. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यावेळी म्हणाल्या, ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांच्या हक्काबाबत तक्रारी जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्र/ठिकाणावरुन प्राप्त होण्याकरीता सर्व विभागांनी आपल्या नोटीस बोर्डवर, आपल्या विभागाच्या शाखा, उपशाखा मार्फत सदर जनसुनावणी संदर्भात माहिती प्रदर्शीत करुन जनजागृती करण्यात यावी. तसेच ज्या ठिकाणी बाल हक्क संरक्षणाचे जनसुनावणीबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे त्या ठिकाणी दवंडीद्वारे प्रचार करण्यात यावा. तसेच गाव/खेड्यात विविध सार्वजनिक क्षेत्र/कार्यालये, शाळा, वसतिगृह, आश्रमशाळा, अंगणवाडी इत्यादी ठिकाणी जनसुनावणीबाबत माहिती प्रदर्शीत करुन ० ते १८ वर्ष वयोगटातील बाल हक्क संरक्षण संदर्भात तक्रारी प्राप्त करुन घेवून १९ जुलै रोजी गडचिरोली येथे जनसुनावणीस उपस्थित राहण्यास प्रोत्साहित करावे. तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी सुध्दा बाल हक्क तक्रारीसह उपस्थित राहावे असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक महिला व बाल विकास विभागाचे परिविक्षा अधिकारी श्री.बोरीकर यांनी केले. प्रास्ताविकातून त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांच्या वतीने ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांच्या हक्काबाबत तक्रारी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे १९ जुलै २०१९ रोजी सकाळी ९ वाजतापासून जनसुनावणी होणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या बालकांच्या हक्काचे उल्लंघन होत असल्यास या जनसुनावणीचा अवश्य लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. सभेला विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.