मुख्य बातम्या:

प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात,प्राचर समितीच्या अध्यक्षपदी पटोले

मुंबई ,दि.१४ :: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आली आहे. थोरात यांच्याकडे निवडणूक व रणनीती समितीची सूत्रेही सोपविली आहेत तर के. सी. पाडवी यांच्याकडे विधिमंडळ पक्षनेतेपद देण्यात आले आहे. थोरात यांच्यासमवेत नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुजफ्फर हुसेन यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.प्रचार समितीच्या अध्यक्षपदी माजी खासदार नाना पटोलेंची नियुक्ती करण्यात आली आहे.एकप्रकारे नव्या तरुणतुर्क चेहर्यांना संधी देत जोश भरण्यावर काँग्रेसने भर दिल्याचे दिसून येते.
सोबतच पाच कार्याध्यक्षांचे मंडळ तयार केले आहे. त्यात राजकीय समीकरणेही साधण्याचा प्रयत्न झाला आहे. पक्षनेते विरोधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपची वाट स्वीकारली. त्यानंतर नगर जिल्ह्यातूनच प्रदेशाध्यक्षपदासाठी थोरात यांची नेमणूक करून पक्षाने नगर जिल्ह्याला महत्त्व दिले आहे. हर्षवर्धन पाटील यांना प्रदेशाध्यक्ष व्हायचे होते. तशी त्यांनी इच्छाही व्यक्त केली होती. विदभार्तून विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यानंतर आता पक्षाने नितीन राऊत यांना कार्याध्यक्ष करून विदर्भात आणखी एक महत्त्वाचे पद देऊ केले आहे. त्यासोबतच यशोमती ठाकूर यांच्या रूपाने एका महिला नेत्यालाही जबाबदारी दिली आहे. गेले काही वर्षे पक्षापासून दूर असलेल्या मुजफ्फर हुसेन यांनाही पक्षाने जबाबदारी देत मुस्लिम समाजातही आपली छबी कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच पक्षाने अशोक चव्हाण यांना ‘स्ट्रॅटेजी कमिटी’चे सह-अध्यक्ष केले आहे. हर्षवर्धन पाटील यांना समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे. त्याशिवाय या समितीत मिलिंद देवरा, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, सुनील केदार, शरद रणपिसे, के.सी. पाडवी, विजय वडेट्टीवार, जयवंतराव आवळे, नाना पटोले, नसीम खान आणि रामहरी रुपनवर यांचाही ‘स्ट्रॅटेजी कमिटी’मध्ये समावेश करण्यात आला आहे.

इतर समित्या व त्यांचे अध्यक्ष
समन्वय समिती : सुशीलकुमार शिंदे
जाहीरनामा समिती : पृथ्वीराज चव्हाण
माध्यम व संवाद समिती : राजेंद्र दर्डा
प्रचार समिती : नाना पटोले
प्रसिद्धी – प्रकाशन समिती : रत्नाकर महाजन
निवडणूक व्यवस्थापन समिती : शरद रणपिसे

Share