ग्राहकांना योग्य रिडिंगचे वीज बिल द्या-मुख्य अभियंता शेरकर

0
6

गोंदिया ,दि.१४ ::: ग्राहकांना उत्तम सेवा देणे हे आमचे कर्तव्य असून महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना योग्य रिडींगचे वीज बिल द्यावे. तसेच वापरलेल्या प्रत्येक युनिटचे वीज बिल वसूल करावे असे प्रतिपादन  महावितरण गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर यांनी केले.
येथील कार्यालयात गोंदिया परिमंडळातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत अधीक्षक अभियंता ओंकार बारापात्रे, नीरज वैरागडे, सम्राट वाघमारे, कार्यकारी अभियंता शरद वानखेडे, सुहास धामणकर, अमिल शिवलकर (प्रभारी), आशा वाघमारे, अविनाश तुपकर, समिधा लोहरे, वरिष्ठ व्यवस्थापक प्रकाश हिंगे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना शेरकर यांनी, माहे एप्रिल ते जून या कालावधीत झालेल्या वीज देयकानुसार डिमांड, वसुली व पुढील उद्दिष्टे यावर चर्चा करून अधिकारी-कर्मचाºयांना वीज देयकाच्या बाबतीत सजग राहण्याचे निर्देश दिले.
तसेच वीज मीटर बदलताना आवश्यक ती काळजी घेण्याबाबत तसेच वीज पुरवठा कायमचा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांची नियमित तपासणी करण्याबाबतचे व एजंसीने मीटर वाचन घेतल्यानंतर त्याची उलट तपासणी करण्याचे उपस्थित अधिकारी- कर्मचाºयांना निर्देश दिले. ज्या कृषी पंप ग्राहकांनी उच्च दाब वितरण प्रणाली अंतर्गत वीज जोडणीकरीता अर्ज केलेला आहे व ज्यांचे पोल उभारणीचे काम पूर्ण झालेले आहे अशा ग्राहकांनी रोहित्र बसविण्याकरीता महावितरणच्या संबंधीत कार्यालयास कळवावे असेही सांगीतले.
महाराष्ट्र शासनाद्वारे कृषी पंपाला सौर उर्जेद्वारे वीज जोडणी देण्याकरीता मुख्यमंत्री सौर कृषी योजना सुरु करण्यात आली असून त्यामध्ये १ एप्रिलनंतर मागणीपत्र भरणा केलेल्या सर्व लाभार्थ्याना तसेच नवीन लाभार्थ्यांचा समावेश ३ एचपी व ५ एचपीडीसी सौरपंप वितरीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. बैठकील समस्त उपविभागीय अभियंता, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.