राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग;गडचिरोली येथे जनसुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन

0
13

गोंदिया : राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांच्या वतीने १९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांच्या विविध समस्या व तक्रारीबाबत जनसुनावणी होणार आहे. यामध्ये नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा या जिल्ह्याचा समावेश राहणार आहे. यासंदर्भात १७ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली बाल हक्क संरक्षण जनसुनावणीबाबत पुर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी हरिश धार्मिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना ही बाल अधिकार संरक्षण अधिनियम-२००५ नुसार मार्च २००७ मध्ये गठीत करण्यात आलेली भारत सरकारची वैधानिक संस्था आहे. आयोगाचा मुख्य उद्देश संविधान व इतर अधिनियमात दिलेल्या तरतूदीनुसार सर्व बालकांना त्यांच्या स्वत:च्या हक्काची जाणिव होवून ते प्राप्त व्हावे याबाबत जागृती करणे असा आहे.
आयोगाचे खंडपीठ सर्व जिल्ह्यामध्ये भेट देतात. कोणत्याही बाल हक्क उल्लंघनाची तक्रार घेण्याकरीता कोणतीही व्यक्ती, पालक, बालक, आई-वडील, काळजीवाहक व इतर कोणतीही व्यक्ती जे बाल हक्कासाठी काम करतात ते आयोगाच्या खंडपीठासमोर त्यांची तक्रार दाखल करु शकतात. १९ जुलै २०१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे प्राप्त सर्व तक्रारींची नोंदणी सकाळी ९ वाजता होणार असून सकाळी १० वाजता बालकांच्या तक्रारीबाबत जनसुनावणी होणार आहे.
जिल्ह्यातील सर्व बालके जसे- रस्त्यावर राहणारी बालके, बालकांची काळजी घेणारी संस्था, बालगृह, वसतिगृह किंवा इतर ठिकाणी जिथे बालके शिक्षण/प्रशिक्षण घेतात किंवा ज्या ठिकाणी निवासी राहतात वा इतर ठिकाणचे बालके आयोगाच्या खंडपीठासमोर ते स्वत: तक्रार दाखल करु शकतात किंवा बालकाच्या वतीने इतर कोणतीही व्यक्ती तक्रार दाखल करु शकतात.
बालकाद्वारे रस्त्यावर सामानाची विक्री करणे, आई-वडील/पालक/दुसऱ्या व्यक्तीसोबत रस्त्यावर भीक मांगणे, जबरदस्तीने भीक मागवणे, घरगुती हिंसाचारात पिडीत बालके, पिडीत बालकांचा भेदभाव, पोलिसांद्वारे बालकांना मारहाण, बालकांची काळजी घेणाऱ्या संस्थेत गैरवर्तन/पिळवणूक होणे, बेकायदेशीर दत्तक घेणे/देणे, बालकाची काळजी घेणाऱ्या संस्थाद्वारे बालकांची विक्री, बालकांविरुध्द हिंसाचार, निष्काळजीपणामुळे बालकाचा मृत्यू, अपहरण, हरवलेले बालक, इलेक्ट्रॉनिक/सोशल/छपाई माध्यमांवर बाल अधिकाराचे उल्लंघन, शाळेमध्ये शारिरीक दंड/शारिरीक गैरवर्तणूक, शाळेमध्ये प्रवेश न देणे, लैंगिक गैरवर्तन, वैद्यकीय निष्काळजीपणा, उपचारात विलंब करणे, निष्क्रियता संबंधित, आजार संबंधित, कुपोषण, मध्यान्ह भोजन, अंमली पदार्थाचा गैरवर्तन इत्यादी व याशिवाय बाल हक्कासंदर्भात इतरही तक्रारी असल्यास १९ जुलै रोजी गडचिरोली येथे होणाऱ्या जनसुनावणीस उपस्थित राहून नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलवकडे यांनी केले आहे.
सभेला जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.पौनीकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखडे, सहायक पोलीस निरीक्षक (गुन्हे) पी.एम.अतुलकर, महिला व बालविकास विभागाचे परिविक्षा अधिकारी श्री.बोरीकर, एकात्मिक आदिवासी प्रकल्प देवरीच्या सहायक प्रकल्प अधिकारी श्रीमती आर.पी.मिश्रा, सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचे सचिन अरबट, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डॉ.एन.जी.अग्रवाल, बाल न्याय मंडळाचे सदस्य आर.डी.बडगे उपस्थित होते.