खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा;सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

0
17

वाशिम, दि. १९ : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आणि जीत प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सक्रीय सहभागाबाबतची कार्यशाळा १७ जुलै रोजी हॉटेल मनिप्रभा येथे संपन्न झाली. कार्यशाळेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अश्विन हाके, नागपूरचे डॉ. शैलेश लिचडे, जीत प्रकल्पाचे योगेश धोंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी डॉ. सोनटक्के म्हणाले, क्षयरुग्ण हे खासगी डॉक्टरांकडे क्षयरोगाचे निदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे त्यांनी खासगी क्षयरुग्णांची माहिती शासकीय यंत्रणेला देणे बंधनकारक आहे.

डॉ. आहेर म्हणाले, सन २०२५ पर्यंत देशातून क्षयरोग निर्मुलनासाठी प्रत्येक क्षयरुग्णांचे उपचारावर संनियंत्रण करून उपचार पूर्ण करणे आवश्यक आहे. शासकीय, खासगी वैद्यकीय यंत्रणा, औषध विक्रेते यांनी जिल्हा क्षयरोग केंद्राशी समन्वय राखावा व प्रत्येक क्षयरुग्णावर पूर्ण उपचार होईल, याकडे लक्ष द्यावे.विशेष वक्ते म्हणून बोलताना डॉ. लिचडे यांनी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार नवीन निदान पद्धतीच्या वापरामध्ये सीबी-नॅट मशीनचा वापर करावा, असे सांगितले. वाशिम येथील डॉ. प्रवीण ठाकरे यांनी क्षयरोगाच्या उपचार पद्धतीची माहिती दिली. तसेच निदान कसे करावे, याबाबतही मार्गदर्शन केले.

शासकीय योजना व खासगी डॉक्टरांचा सहभाग, तसेच क्षयरुग्ण निदान केल्यास डॉक्टरांना मिळणारे मानधन, निदान व रुग्णांना मिळणारा आहार भत्ता याबाबतची माहिती देत क्षयरोगाचे निदान झाल्यास त्याची माहिती शासकीय यंत्रणेस देणे बंधनकारक असून भारतीय दंड संहितेनुसार कलम २६९ व कलम २७० नुसार माहिती न देणाऱ्यास असलेल्या शिक्षेबाबत डॉ. हाके यांनी माहिती दिली. आयएमए संघटना वाशिम या कामास पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही आयएमएचे अध्यक्ष डॉ. कावरखे यांनी यावेळी दिली. यावेळी आयएमए संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन साईराम वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्षयरोग केंद्राचे श्री. लोनसुने, श्री. जयकुमार, श्री. भगत, श्री. सोनुने व श्री. शिंदे यांनी परिश्रम घेतले.