गर्भवती महिलांसाठी धावून आला तालुका टास्क फोर्स

0
32

 जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाची अनोखी यशस्वी कथा

गडचिरोली,दि.२६  जुर्ले : सौ.मीना नरोटे व सौ.लता गावडे या गर्भवती महिला प्रशासनाच्या विनंती नंतरही दवाखान्यात ॲडमिट होण्यास टाळाटाळ करत होत्या. डॉक्टरांनी त्यांची बिकट परिस्थिती पाहून दोघींनाही ताबडतोब जिल्हा महिला व बाल रूग्णालयात भरती होण्याच्या सुचना दिल्या. पंरतू त्यांची व घरच्यांची मानसिकता नव्हती की प्रसुतीसाठी दवाखान्यात जावे. या दोन्ही गर्भवती महिलांना जिल्हा प्रशासनाच्या तालुका टास्क फोर्सने रेगडी येथील शासकीय दवाखान्यात आणले. आज मीना नरोटे यांनी बाळाला जन्म दिलाय व दोघेही सुखरूप आहेत. लता गावडे यांची अजून प्रसूती व्हायची आहे. जर दवाखान्यात त्यांच्यावर वेळेत उपचार व सेवा झाली नसती तर त्यांच्या जीवाला धोका होता. अशा या अंगावर शहारे आणणा-या प्रवासाची ही कथा आहे.

अतिशय दुर्गम, संवेदनशील भागात अरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी दोघींनाही ३ जुलै रोजी भेटून प्रसुती प्रक्रियेतील अडथळे लक्षात देवून दवाखान्यात भरती होण्याच्या सुचना दिल्या. त्या  दोघींचीही प्रकृती चांगली नव्हती. तरीही त्यांनी दवाखान्यात भरती होण्यास नकार दिला. शेवटी पुन्हा आरोग्य कर्मचारी यांनी 10 जुलै रोजी प्रयत्न केले, मात्र पुन्हा अपयश आले. रेगडी प्राथमिक आरेाग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.मेश्राम यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी संबंधित महिलांचे व कुटुंबियांचे लेखी घेवून पून्हा गांर्भियाची जाणीव करून दिली. मात्र पुन्हा अपयश. आता हा विषय जिल्हा प्रशासनाकडे मांडण्याचे त्यांनी ठरविले. सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद मशाखेत्री यांच्या सहाय्याने दोन्ही गर्भवती महिलांची घटना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या पर्यंत पोहचविण्यात आली.

मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन कक्षाद्वारे कामाला सुरूवात झाली. सदैव तत्पर आणि गतीने काम करणा-या जिल्हा आपतकालीन कक्षाने लगेच तालुका टास्क फोर्सची मदत घेवून कामाला सुरूवात केली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा रेड्डी यांनी विविध विभाग व येत्रणेला संपर्क साधून त्यांचा सहभाग व घटनेचे गांर्भिय लक्षात आणून दिले. तालुका टास्क फोर्स खरे तर नैसर्गिक किंवा इतर आपत्तीमध्ये कार्य करताना दिसतेा. याही ठिकाणी या फोर्सने  आपतकालीन स्थिती समजून दोन्ही महिलांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करायचे ठरविले. महसूल यंत्रणा, आरेाग्य विभाग व पोलीस यांचा समावेश असलेल्या या आपतकालीन टास्क फोर्सने सुत्र हातात घेवून गावात पाऊल ठेवले. प्रशासनाच्या मदतीने दोघींच्याही घरी सांगून विनंती करून त्यांनी रूग्णवाहिकेत बसविण्यात आले. सोबत घरातलेही घेण्यात आले. महिला कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांच्या उपस्थितीत त्यांनी रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्रात हालविण्यात आले. याचे वेळी दोघींना लागणारे रक्त रक्तपेढीत इाहे का? त्यांचा रक्तगट कोणता? याबाबत तयारी केली गेली.

इच्छा नसताना एखाद्या गर्भवती महिलेला सरकारी दवाखान्यात आणने ही बाब छोटी नाही. या ठिकाणी प्रशासनाला त्यांच्या प्रसुतीमधील बिकट स्थितीची जाणीव होती. आणि त्या कुटुंबाला या गुंतागुंतीच्या विषयांबद्दल माहिती कळत नव्हती. या सर्व स्थितीमध्ये आरोग्य, महसूल व पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील राशेन दुकानदार, पालीस पाटील, सरपंच यांनी सहकार्य केले. जिल्हा स्तरावरून याबाबत सुचना प्राप्त झाल्यावर उपजिल्हाधिकारी, चामोर्शी विजया जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, उप पोलीस अधीक्षक श्री गायकवाड, तहसिलदार मुलचेरा श्री तलांडे यांनी आपल्या सहका-यांना सुचना देवून या स्थितीला गती दिली. दिनांक 24 जुलै रोजी रात्री दोघींनाही प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. 25 जुलै रोजी मीना नरोटे यांची प्रसुती झाली, त्यांना 3.3 कि.चे बाळ झाले. आज दोघेही सुखरूप आहेत. लता गावडे या दुस-या गर्भवती महिलेवरती डॉक्टरांची देखरेख सुरू असून गडचिरोली येथे नेहण्याचे नियोजन सुरू आहे.

शेखर सिंह, जिल्हाधिकारी : आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तालुका टास्क फोर्सच्या मदतीने चांगले काम केले आहे. प्रशासनाकडून मान्सून काळात खंडित गावातील गर्भवती स्त्रियांची प्रसूती तारीखनिहाय यादी बनवून नियमित सनियंत्रण करण्याच्या सुचना आरोग्य विभागाला मान्सून पूर्व बैठकीतच दिलेल्या आहेत.

 जिल्हाधिकारी शेख सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कृष्णा रेड्डी व तालुका टास्क फोर्सच्या मदतीने आज दोन्ही गर्भवती महिलांचे प्राण वाचले. खरतर जिल्हा प्रशासन यांनी केलेल्या नियोजनातून व तालुका प्रशासनाच्या प्रत्यक्ष कामातून या अगोदरही गेल्यावर्षी 9 अत्यावस्थ गर्भवती महिलांना सुखरूप बाहेर काढून दवाखान्यात आणले होते. आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि एकुणच प्रशासन नेहमी सकारात्मक विचार करून अतिशय दुर्गम भागातील नागरिकांना मदतीचा हात देत आहेत.

सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, विनोद मशाखेत्री -दुर्गम भागात गर्भवती महिला व त्यांच्या कुटुंबीयांची अशी इच्छा असते की प्रसूती ही घरीच व्हावी विनाकारण दवाखान्यात जाऊन खर्च किंवा इतर बाबी वाढवण्यापेक्षा  घरी प्रसूती करण्याचा ते निर्णय घेतात.  त्यांना त्यांच्या बिकट परिस्थितीची कल्पना नव्हती. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रक्रियेला यशस्वी केले.