प्रशासकीय इमारतीमुळे एकाच छताखाली लोकांची कामे गतीने होणार- पालकमंत्री डॉ.परिणय फुके

0
39

नविन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण
गोंदिया दि.३१- : गोंदिया शहराच्या ह्दयस्थानी भव्य अशी सुसज्ज प्रशासकीय इमारत उभी झाली आहे. या नविन प्रशासकीय इमारतीमुळे यापुर्वी शहरात विविध ठिकाणी विखुरलेली कार्यालये आता एकाच ठिकाणी आली आहे. त्यामुळे लोकांची कामानिमीत्त होणारी पायपीट थांबून लोकांचा कामानिमीत्त होणारा वेळ, पैसा व श्रम वाचण्यास देखील मदत झाली आहे. प्रशासकीय इमारतीत विविध कार्यालये एकाच छताखाली आल्यामुळे लोकांची कामे गतीने होण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केले.
३० जुलै रोजी गोंदिया येथील जयस्तंभ चौकातील नविन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री डॉ.फुके यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजकुमार बडोले होते. यावेळी खासदार सुनिल मेंढे, आमदार संजय पुराम व विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, भारतीय सनदी सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी रोहन घुगे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.समाज कल्याण समिती सभापती विश्वजीत डोंगरे व जि.प.पशु संवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री डॉ.फुके पुढे म्हणाले, प्रशासकीय इमारतीची शहरात भाड्याने विविध ठिकाणी असलेल्या कार्यालयाला आवश्यकता होती. त्यांची ही गरज सुसज्ज अशा या इमारतीतून पूर्ण झाली आहे. इमारत बांधणे सोपे आहे, परंतू इमारतीची देखभाल करणे तितकेच कठीण काम आहे. या इमारतीत २८ विविध कार्यालये कार्यरत आहेत. त्यामुळे प्रशासकीय इमारतीत असलेल्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तसेच कामानिमीत्त येणाऱ्या नागरिकांनी स्वच्छता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. या इमारतीत अग्नीशमन यंत्र बसविले आहेत. विविध साहित्य कार्यालयांना उपलब्ध करुन देण्यासोबतच फर्निचर देखील एकसारखे बसविले आहे. या इमारतीच्या परिसरात ६ दुकाने तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक दुकान महिला बचतगटासाठी राखीव ठेवण्यात यावे, त्यामुळे बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री करणे सोईचे होईल. दुसरे दुकान दिव्यांग बांधवांना उपलब्ध करुन दयावे, तेथे एखादे झेरॉक्स सेंटर सुरु करुन त्याला रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमगाव व सालेकसा तहसिल कार्यालय इमारतीचे काम पुर्णत्वास आले असून लवकरच या इमारतीचे लोकार्पण करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षस्थानावरुन बोलतांना आमदार श्री.बडोले म्हणाले, बऱ्याच दिवसापासून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या गोंदियाचे वैभव असलेली ही नविन प्रशासकीय इमारत आजच्या लोकार्पणामुळे नागरिकांच्या सेवेत आली आहे. या इमारतीमुळे विविध कार्यालये एकाच छताखाली येणार असल्यामुळे नागरिकांना त्यांची कामे करणे सोईचे होणार आहे. सोबतच प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सुध्दा नागरिकांची कामे गतीने करता येणार आहे. या इमारतीत दिव्यांग बांधवांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट आहे, त्यामुळे दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांना इमारतीतील विविध कार्यालयात कामानिमित्ताने ये-जा करण्यास सोईचे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासन निर्णयानुसार गोंदिया शहरातील सिंधी बांधवांना सत्ता प्रकार-अ या आखिव पत्रिकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास माजी आमदार हेमंत पटले व रमेश कुथे, जि.प.उपाध्यक्ष अलताफ हमीद, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, माजी जि.प.अध्यक्ष नेतराम कटरे, माजी नगराध्यक्ष के.बी.चव्हाण, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, भाजपा जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांच्यासह जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख यांनी केले. संचालन श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी केले, उपस्थितांचे आभार उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी मानले.