‘आयुष्मान भारत’च्या लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे-जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

0
42

वाशिम, दि. ३१ : आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी गोल्ड कार्ड प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. कॉमन सर्व्हिस सेंटर, ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र अथवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे अंगीकृत रुग्णालयात नोंदणी करून हे गोल्डन कार्ड प्राप्त घेता येईल. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या ई-कार्ड वाटप विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे समन्वयक डॉ. स्वप्नील सरनाईक, कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा समन्वयक भगवंत कुलकर्णी, श्री. देशमुख यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या गोल्डन कार्डधारकांना सुद्धा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील १ लक्ष ३५ हजार ५५३ कुटुंबातील ४ लक्ष ५९ हजार ६४१ व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी कॉमन सर्व्हिस सेंटर, ग्रामपंचायतीमध्ये नियुक्त डाटा एन्ट्री ऑपरेटर व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. या यादीमध्ये नाव असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड तयार करण्यासाठी शिधापत्रिका, माननीय प्रधानमंत्री प्रधानमंत्री यांचे स्वाक्षरीचे वितरीत करण्यात आलेले पत्र आणि आधारकार्ड सोबत आणावे. एखाद्या कुटुंबास माननीय प्रधानमंत्री यांचे स्वाक्षरीचे पत्र वितरीत झाले नसेल व त्यांचे नाव लाभार्थी यादीत असेल तर त्यांनी शिधापत्रिका व आधारकार्ड सोबत आणावे.

सर्व कॉमन सर्व्हिस सेंटर अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये गोल्डन कार्ड तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जावी. तसेच प्रत्येक केंद्रनिहाय झालेल्या कार्ड वितरणाचा नियमित अहवाल सादर करावा. कार्डसाठी अतिरिक्त शुल्क आकारले गेल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून प्राप्त झाल्यास त्याची तातडीने दखल घेवून संबंधित दोषी केंद्र चालकावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मीना म्हणाले, आशा वर्कर्सच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला गोल्डन कार्ड बनविण्याबाबत माहिती देण्यात येत आहे. त्यानुसार कॉमन सर्व्हिस सेंटर व आपले सरकार सेवा केंद्रामध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांचे कार्ड त्वरित बनवून दिले जावे.

डॉ. सरनाईक म्हणाले, ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर यासह महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अंगीकृत असलेल्या वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, देवळे हॉस्पिटल, कानडे हॉस्पिटल, बिबेकर हॉस्पिटल व बाहेती हॉस्पिटल येथील आरोग्य मित्रांना भेटून नोंदणी करावी. आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर येथून कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी प्रती व्यक्ती ३० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अंगीकृत रुग्णालयामध्ये याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.