यशोगाथा-सुजाताला स्वयमचा आधार

0
63

गोंदिया,दि.02ः- जिल्हा राज्याच्या पुर्वेकडे वसलेला असून त्याला छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्याची सीमा लागून आहे. हा जिल्हा मागास,दुर्गम,नक्षलदृष्ट्या संवेदनशील आणि आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील आदिवासी भागातील अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या बालकांचे कुपोषण दूर व्हावे यासाठी त्यांच्या आहारात अंगणवाड्यांच्या माध्यमातून अंड्यांचा पुरवठा व्हावा आणि कुक्कुट पालनाच्या माध्यमातून आदिवासी कुटूंबांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी स्वयम प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे. सालेकसा तालुक्यातील जमाकुडो या नक्षलप्रभावीत, दुर्गम व आदिवासी वस्ती असलेल्या गावातील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कार्यरत असलेल्या जान्हवी स्वयंसहायता बचतगटाच्या सचिव सुजाता राजकुमार कुमडे यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करुन कुटूंबाच्या कर्त्या पुरुषाला अर्थोत्पादनात हातभार लावला आहे.
राज्य शासनाने २९ एप्रिल २०१७ रोजी एक निर्णय घेवून आदिवासी भागातील कुटूंबांची संतुलीत आहाराची गरज लक्षात घेवून तसेच त्या कुटूंबांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी अंड्यांचा पुरवठा करण्यासोबतच रोजगार निर्मिती करण्याच्या मुख्य उद्देशातून स्वयम प्रकल्प सुरु केला आहे. सुजाताला या प्रकल्पामुळे रोजगार निर्माण होण्यास मदत झाली आहे. सुजाताला सन २०१८-१९ या वर्षात मार्च २०१९ मध्ये या प्रकल्पातून सातपुडा देशी प्रजातीची ४५ कोंबडीची पिल्ले देण्यात आली. पहिल्या टप्प्यात २०, दुसऱ्या टप्प्यात १५ आणि तिसऱ्या टप्प्यात १० अशा एकूण ४५ पक्षांचा पुरवठा करण्यात आला.
सुजाताचा जान्हवी स्वयंसहायता बचतगट हा पिपरटोला येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जयसेवा लोकसंचालीत साधन केंद्राअंतर्गत कार्यरत असून जमाकुडो येथील कचारगड ग्रामसंस्थेशी जुळला आहे. मागीलवर्षी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी जमाकुडो येथील कचारगड ग्रामसंस्थेत आले असता त्यांनी बचतगटातील महिलांना तंत्रशुध्द कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे कोंबडी पालन कसे करावे याची दिशा मिळाल्याचे सुजाताने सांगितले. सुजाताला ९७५ रुपये अंडी विक्रीतून मिळाले. ५ रुपये प्रती अंडा याप्रमाणे विक्री केली. अंगणवाडीत देखील सुजाताजवळून ६ रुपये प्रती अंडी याप्रमाणे खरेदी केली. १५० अंडी गावच्या अंगणवाडीला सुजाताने विकली. अंगणवाडीची अंडीची गरज पूर्ण करुन इतरांनाही अंडीची विक्री केली. कोंबडे सुध्दा यामध्ये होती. ३५० रुपये प्रती किलो याप्रमाणे कोंबडे विक्रीतून ८७५० रुपये तीन महिन्यात सुजाताला मिळाले.
पावसाच्या पाण्यावर अवलंबून अडीच एकर घरच्या शेतीत काम करणाऱ्या सुजाताला कुक्कुटपालन व्यवसाय एक रोजगाराचा आधार झाला. कोंबड्या ठेवण्यासाठी खुराडा तयार करण्यासाठी १५०० रुपये प्रकल्पातून मिळाले. पाच महिन्यात सुजाताला कोंबडी पालनातून ९६७५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. बांबूपासून सुप-टोपल्या तयार करण्याचे काम सुध्दा सुजाता फावल्या वेळेत करते. जमाकुडो येथे पोलीस दूरक्षेत्र केंद्र आहे. आठवडी बाजार इथे भरत असल्यामुळे अंडी व कोंबड्यांना चांगली मागणी आहे. यामधून चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे कुक्कुटपालन या व्यवसायासाठी स्वयम प्रकल्पाची सुजाताला चांगली मदत झाली आहे. उत्पन्नाचे एक नवीन साधन मिळाल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास सुजाताला स्वयमचा आधार झाला आहे.