मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदान जागृती मोहीम राबवा-अश्विन मुदगल

0
11

विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा 

नागपूर, दि.4:  लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान कमी झाले आहे. अशा भागात विधानसभेच्या आगामी  निवडणुकीसाठी  मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी मतदार जागृती मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी आज दिल्या.

छत्रपती सभागृहात विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, श्रीमती सुजाता गंधे तसेच विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी व विविध समित्यांचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती झोनल अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यासोबतच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हाताळण्यासंदर्भात तसेच निवडणूक प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना क्लासरुम ट्रेनिंग देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी  दिल्या.मतदार यादी नवीन नाव नोंदणी तसेच मतदार यादीत असलेल्या नावांमध्ये बदल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली असून यांतर्गत जिल्ह्यात 73 हजार 118 अर्ज ऑफलाईन प्राप्त झाले आहेत. या अर्जांची डेटाएंट्री करुन या अर्जावर दिनांक 12 ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्यात. विधानसभा मतदारसंघनिहाय असलेले मतदान केंद्र तसेच या मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा यासंदर्भातही प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करावा, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. नोडल अधिकारी यांना विधानसभा निवडणुकीसंदर्भात दिलेल्या जबाबदारीनुसार कामांना सुरुवात करुन यासंदर्भात झालेल्या पूर्ततेसंदर्भातील अहवाल नियमित देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी दिल्या.प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे करावयाच्या उपाययोजना तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय करण्यात आलेल्या सुविधांबाबतही यावेळी माहिती दिली.