मुख्य बातम्या:

कोल्हापूर-सांगली बुडत असताना सरकार महाजनादेश यात्रेत व्यस्त होते – नाना पटोले

अकोला,दि.10 : राज्यातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नागरिक अडचणीत सापडले असताना, राज्य सरकार मात्र महाजनादेश यात्रेत व्यस्त होते, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रदेश प्रचार प्रमुख माजी खासदार नाना पटोले यांनी शनिवारी अकोल्यात केला.
अकोल्यातील स्वराज्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगत, हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळे पूर परिस्थितीला राज्य सरकार जबाबदार असून, यासंदर्भात सरकार विरोधात काँग्रेसच्यावतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगीतले. जम्मू- काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला आमचा विरोध नाही; मात्र जाती-धर्माच्या नावावर राजकारण होऊ नये, देशातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहीजे, अशी आमची भूमिका असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. २१ आॅगस्ट रोजी राज्यात ‘इव्हीएमङ्क विरोधात बिगर राजकीय आंदोलन होणार असल्याचेही नाना पटोले यांनी सांगीतले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस किसान सेलचे उपाध्यक्ष श्याम पांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष तथा माजी आमदार बबनराव चौधरी, लक्ष्मणराव तायडे, नातिकोद्दीन खतीब, काँग्रेसचे प्रदेश महासचिव मदन भरगड उपस्थित होते.

Share